चाकण नगराध्यक्षपदासाठी चुरस

चाकण नगराध्यक्षपदासाठी चुरस

चाकण - चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक २९  मे रोजी आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या नगरसेविका सुरेखा गालफाडे, शिवसेनेचे शेखर घोगरे, स्नेहा जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षाचे पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तीनही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिली. दरम्यान, या निवडणुकीत अपक्ष सदस्य काय करतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २८ मे रोजी सायंकाळी पाचपर्यंत मुदत आहे. २९ मे रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत अर्जाची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी साडेबारा ते एक आहे. दुपारी एकनंतर उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या एकमेव नगरसेविका सुरेखा गालफाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. गालफाडे यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक अपक्ष नगरसेवक आहेत. नगर परिषदेत एकूण संख्याबळ तेवीस आहे. यामध्ये शिवसेनेचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, भाजपचा एक, अपक्ष पाच असे बळ आहे. गालफाडे यांच्या नगराध्यक्षपदाच्या अर्जावर सूचक, अनुमोदक अपक्ष झाल्याने उपनगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे शिवसेना व अपक्ष यांच्यात उपनगराध्यक्षपदासाठी खरी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र तटस्थ आहे. शिवसेनेचे नगरसेवक किशोर शेवकरी हे उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांना डावलून शेवकरी यांना संधी मिळते की अन्य कोणाला हे मात्र आमदार सुरेश गोरे ठरविणार आहेत. नगर परिषदेवर शिवसेनेची अपक्षांना बरोबर घेऊन सत्ता असल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष शिवसेनेचा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आहे. अपक्ष नगरसेवक प्रकाश भुजबळ, सुदाम शेवकरी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com