संघटना भक्कम करण्याचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - एकामागून एक अशा तब्बल सहा नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षाला ठोकलेला रामराम, इच्छुकांची लेखी परीक्षा आणि नंतर अर्ज मागवून शेवटी मुलाखती अशा गेल्या वेळच्या जंगी कार्यक्रमाला फाटा देऊन नेमके काय करायचे याबाबत अजूनही असलेली अनिश्‍चितता ही आव्हाने पुढ्यात घेऊनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे "राजसाहेब' पुण्यात येत आहेत. गत निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक दिमाखाने निवडून आणणारा मनसे आपली मोर्चेबांधणी कशी करणार, याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्‍य आहे. 

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 29 नगरसेवकांसह मनसेने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. त्यानंतर त्या पक्षाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. आता पुढची निवडणूक तोंडावर उभी असताना गेल्या वेळची पुनरावृत्ती हा पक्ष करेल की नाही, हा प्रश्‍न राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे. त्यातच या पक्षातून पक्षांतर झाले आहे. तसेच गेल्या निवडणुकीआधी इच्छुकांना महापालिकेच्या कारभाराची कितपत माहिती आहे, ते तपासण्यासाठी त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. अशी कडक परीक्षा घेण्याजोगी परिस्थिती आता आहे का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असून, मुलाखतीच्या आघाडीवर अजूनपर्यंत तरी सामसूम आहे. पक्षाच्या महिला, युवक, विद्यार्थी आदी आघाड्यांनाही मुख्य प्रवाहात आणून अधिक कार्यान्वित करण्याच्या पक्ष संघटनेच्या प्रयत्नाला पुरेसे यश आलेले नाही. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गर्दी होते, असा संघटनेचा अनुभव आहे. मात्र त्याचे रूपांतर पक्षसंघटनेच्या सक्षमीकरणात होईल का, या बाबतही कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. 

या पार्श्‍वभूमीवर पक्ष संघटना भक्कम करण्याचे आव्हान मनसेपुढे आहे. त्याचा विचार पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे सध्या करीत आहेत. मनसेने विधानसभानिहाय बैठकांचा टप्पा पार केला आहे. शहरातील पक्षाच्या नगरसेवकांच्या विकासकामांच्या उद्‌घाटनानिमित्त ठाकरे यांनी शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि एकंदर परिस्थितीची चाचपणी केली. आता गुरुवारी होणाऱ्या बैठकीत नांदगावकर कोणता कानमंत्र देणार याकडे पक्षवर्तुळाचे लक्ष लागले आहे.