ऍपद्वारे बॅंकेची फसवणूक; आणखी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

पुणे - यूपीआय ऍपद्वारे "बॅंक ऑफ महाराष्ट्र'ची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. आरोपींची संख्या 8 झाली असून, पोलिसांनी सुमारे 41 लाख रुपये जप्त केले आहेत.

पुणे - यूपीआय ऍपद्वारे "बॅंक ऑफ महाराष्ट्र'ची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. आरोपींची संख्या 8 झाली असून, पोलिसांनी सुमारे 41 लाख रुपये जप्त केले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार बॅंकेने खातेदारांकरिता "यूपीआय ऍप' ही सुविधा उपलब्ध करून दिली. याच्या आधारे खातेदार रक्कम पाठवू आणि मागवू शकतो. या ऍपचा गैरवापर करून 50 खातेदारांनी त्यांच्या खात्यावर रक्कम शिल्लक नसतानाही दुसऱ्या खात्यावर रक्कम पाठवून बॅंकेची सुमारे 6 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्यातील आठवा आरोपी गणेश मारुती ढोमसे (वय 37, रा. तेजेवाडी, जुन्नर) याला पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले.

पोलिस कोठडीची मुदत संपलेल्या आनंद लाहोटी, किरण गावडे यांनाही बुधवारी न्यायालयासमोर हजर केले होते. या तिघांनाही 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यापूर्वी राजेश काबरा, पंकज पिसे, अशोक हांडे, दिनेश मोढवे, संतोष शेवाळे यांना अटक केली असून, इतर नऊ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

आरोपींकडून पोलिसांनी 41 लाख रुपये जप्त केले असून त्यांच्या खात्यातील 33 लाख 55 हजार इतकी रक्कम गोठविण्यात आली आहे. गुन्ह्यासाठी वापरलेले 16 मोबाईल आणि 14 सिमकार्ड जप्त केले आहेत. आरोपी लाहोटी आणि काबरा यांनी 155 वेळा पैसे हस्तांतरित केले. काबराने लाहोटीला दिलेल्या 37 लाख रुपयांपैकी 7 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. गावडे यानेही लाहोटीच्या मदतीने अशा प्रकारे फसवणूक केली आहे. या गुन्ह्यात अटक केलेल्या ढोमसे याने वेगवेगळ्या लोकांच्या सिमकार्डचा वापर करून 162 वेळा पैसे हस्तांतर केले आहेत. या गुन्ह्यातील पसार आरोपींच्या खात्यांतही त्याने पैसे हस्तांतरित केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.

Web Title: cheating by app