पुण्यात उपचारासाठी रोख रक्कम नसल्याने अर्भकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

रुग्णालयाने माझ्यावर अन्याय केला आहे. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. पण, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचाराचे पैसे रोखीने भरण्याचा आग्रह केला. त्यामुळे शस्त्रक्रियेला उशीर झाला.

पुणे - रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये रोख रक्कम भरण्याच्या आग्रहामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईंनी रविवारी केला. नवजात अर्भकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. त्याला दाखल करण्यापूर्वी रुग्णालयातील कोणीही रोख रक्कमेचा आग्रह धरला नसल्याचे रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

चलनातून रद्द केलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय शहरातील मोठ्या रुग्णालयांनी केला आहे. त्या ऐवजी चलनातील इतर सर्व नोटा, क्रेडिट, डेबिट कार्ड, ऑनलाइन पेमेंट किंवा धनादेश या सर्व पद्धतीने रुग्णालयाचे बिल घेतले जाईल, अशी भूमिका शहरातील रुग्णालयांनी घेतली आहे. या पार्श्‍वभूमिवर रूबी हॉल क्‍लिनिकने नवजात अर्भकाच्या शस्त्रक्रियेसाठी साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यापैकी दीड लाख रुपये भरलेही होते. पण, उर्वरित रक्कम भरण्यास उशीर झाल्याने रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल होण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.

आम्रपाली आणि गौरव खुंटे यांना दोन दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात मुलगी झाली. तिच्यावर तातडीने हृदय शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला केईएम रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. या बाबत बोलताना गौरव खुंटे म्हणाले, "रुग्णालयाने माझ्यावर अन्याय केला आहे. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. पण, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचाराचे पैसे रोखीने भरण्याचा आग्रह केला. त्यामुळे शस्त्रक्रियेला उशीर झाला.''