उत्पादन वाढल्याने मिरची ‘फिकी’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

पुणे - मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून तेजीत असलेले मिरचीचे भाव यंदा उतरले आहेत; तसेच पुण्यातील मागणीतही वाढ होऊ लागली आहे.

पुणे - मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून तेजीत असलेले मिरचीचे भाव यंदा उतरले आहेत; तसेच पुण्यातील मागणीतही वाढ होऊ लागली आहे.

आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन होते. तेथे प्रामुख्याने गुंटूर, खम्मम आणि वरंगळ या मिरचीच्या बाजारपेठा आहेत. गुंटूर ही मिरचीची देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ असून, येथून मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांतील मिरची उत्पादन क्षेत्रात पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे उत्पादन चांगले झाले आहे. येथील बाजारात आवक प्रचंड प्रमाणात होत आहे. याचा परिणाम भावावर झाल्याने मिरचीचे भाव उतरले आहेत.

याबाबत पुण्यातील मिरचीचे व्यापारी वालचंद संचेती म्हणाले, ‘‘उत्पादन क्षेत्रात मिरची शीतगृहात साठविली जाते. ही सर्व शीतगृहे भरली आहेत. सुमारे १ कोटी ८० लाख गोणी मिरचीची साठवण झाली आहे. मिरचीचे तेल आणि मसाले उत्पादकांकडून तेथे मागणी आहे. आठवड्याला दहा लाख पोती इतकी आवक तेथील बाजारात होत आहे. पुण्याच्या बाजाराचा विचार करता पुण्यात प्रतिदिन चार ट्रक इतकी आवक होत आहे. मागणी वाढल्याने पुण्यातील बाजारातील भाव उतरले आहेत.   

मागणी वाढल्याला दुजोरा देत व्यापारी बाळासाहेब कोयाळीकर म्हणाले, ‘‘मिरचीला साधारणपणे फेब्रुवारी ते मे या कालावधीत मागणी असते. यंदा उत्पादन वाढल्याने मिरचीने तीन वर्षांपूर्वीचा भाव गाठला असून मागणीत दरवर्षीपेक्षा २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. मसाले उत्पादकांसोबतच
घरगुती ग्राहकांकडूनही खरेदी वाढली आहे. मालाची प्रत चांगली असल्याने ग्राहकांना फायदा होत आहे.’’
 

प्रतिक्विंटलचा भाव (रुपयांत) 
ढब्बी मिरची - १३००० ते १४०००
ब्याडगी मिरची नं १ - १२५०० ते १३०००
ब्याडगी मिरची - ११५०० ते १२०००
खुडवा ब्याडगी - २००० ते २२००
गुंटूर खुडवा - २५०० ते ३०००

Web Title: chilly rate decrease