जिंगल बेल, जिंगल बेल...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

प्रभू येशूच्या जन्माचे जल्लोषात स्वागत होणार  

प्रभू येशूच्या जन्माचे जल्लोषात स्वागत होणार  

पुणे - चर्चमध्ये केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, पेस्ट्रीज, केकने सजलेल्या बेकऱ्या, ख्रिसमस ट्री-आकाशकंदिलाने सजलेले रस्ते अन्‌ सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे जल्लोषपूर्ण वातावरण शनिवारी ख्रिसमस तयारीच्या निमित्ताने शहरात पाहायला मिळाले. ‘जिंगल बेल, जिंगल बेल,  जिंगल ऑल द वे’ असे म्हणत रविवारी प्रभू येशूच्या जन्माचे स्वागत होणार असून, त्याच्या सेलिब्रेशनचा उत्साह कॅम्प, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, औंध, कोरेगाव पार्क, बाणेर आदी भागात दिसत आहे. यात तरुणाईनेही ख्रिसमसची हटके तयारी केली असून, ख्रिसमसचे सेलिब्रेशन तरुणाई ‘लाल’ रंगाच्या थीमनुसार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये करणार आहे. 

रविवारी साजरे होणाऱ्या ख्रिसमसची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी मध्यरात्रीनंतर या सेलिब्रेशनला उधाण येणार आहे. येशू जन्माचे आनंद साजरे करण्यासाठी शहरातील चर्चमध्येही रंगरंगोटी करण्यात आली असून, विशेष प्रार्थना आणि पारंपरिक कार्यक्रमही आयोजिण्यात आले आहेत. मध्यरात्रीनंतर घराघरांमध्ये पारंपरिक प्रार्थना आणि फटाक्‍यांची आतषबाजी होणार आहे, तर सकाळी साडेआठनंतर शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना होणार आहे. यानिमित्ताने विविध मंडळांमध्ये आणि चर्चमध्ये येशू जन्माचा देखावा तयार केला आहे. दोन दिवसांपूर्वीच केक आणि बिर्याणीची ऑर्डर दुकानदारांना देण्यात आली आहे.

चौकाचौकांत सांताक्‍लॉजच्या लाल टोप्या विकणारे विक्रेते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. नाताळनिमित्त शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, आकर्षक पॅकिंगमध्ये ठेवलेली चॉकलेट आणि रंगबेरंगी मेणबत्त्यांनी दुकाने सजली आहेत. कॅम्प परिसर तर विद्युत रोषणाई, आकाशकंदील, ख्रिसमस ट्रीच्या प्रकाशाने उजळून निघाले आहे. मॉलमध्ये सांताक्‍लॉजचा वेश परिधान करून काही मंडळी लहान मुलांना भेटवस्तू आणि चॉकलेट देताना दिसत आहेत. कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

याबाबत सुरेखा ठोंबरे म्हणाल्या, ‘‘ख्रिसमसची तयारी मी २१ तारखेपासून सुरू केली आहे. मी ख्रिसमस स्पेशल केक कुकीज या पदार्थांसोबत शंकरपाळी, चिवडा, करंजी हे फराळाचे पदार्थदेखील बनविले आहेत. दोन प्रकारचे मटण एकत्र करून ग्रेव्ही असणारी ‘सोर्पटेल’ ही डिश बनविणार आहे. मध्यरात्री मी कुटुंबासमवेत ‘मास’साठी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करून केक कापणार आहे. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीचा प्लॅन आहे.’’ 

‘क्राईस्ट चर्च’चे कार्यकारिणी सदस्य आशिष जाधव आणि ‘ऑलसेंट चर्च’चे रेव्हरंट कल्पेश शिरसाट म्हणाले, ‘‘ख्रिसमस हे आनंदी पर्व आहे. येशू जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात होते. त्याची तयारीही पूर्ण झाली असून, चर्चमध्ये पारंपरिक प्रार्थना होणार आहे. या सणाच्या सेलिब्रेशनमध्ये तरुणाईचा सहभाग मोठा असतो. मोठ्या उत्साहाने तरुणाई यात सहभागी होते. अगदी सजावटीपासून ते सेलिब्रेशनच्या पार्टीपर्यंत तरुणांचा उत्साह दिसून येतो. या आनंदात सांताक्‍लॉजही सहभागी होतात आणि भेटवस्तू देतात.’’

ख्रिसमसला मिरवणूक 
ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा महत्त्वाचा भाग म्हणजे मिरवणूक. पेटत्या मेणबत्त्या हातात घेऊन प्रार्थना व मिरवणूक काढण्यात येते. लोक मिरवणुकीत गाणी म्हणत ठिकठिकाणी जातात आणि एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. या मिरवणुकीत सांताक्‍लॉजही सहभागी होऊन लहानग्यांना चॉकलेट आणि भेटवस्तू देतात. आपल्या ‘गुडी बॅग’मधून लहानग्यांना व तरुणांना ते भेटवस्तू देऊन ख्रिसमसचा आनंद व्यक्त करतात. 

सांताक्‍लॉजकडून मुलांना गिफ्ट

जुन्नर - येथील ख्रिश्‍चन बांधवांनी नाताळची जोरदार तयारी केली असून जुन्नर बॉईज होमच्या चर्च तसेच विविध इमारती विद्युत रोषणाई उजळल्या आहेत. नाताळच्या पूर्व संध्येला मुलांना सांताक्लॉजने गिफ्ट दिल्याने त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता. सांताक्‍लॉज बनून, आलेल्या जुन्नर बॉईज होममधील युवकांनी मुलांना खाऊ दिला.

प्रभू येशू ख्रिस्त जन्माचा देखावा सादर करणारी गव्हाण, ख्रिसमस ट्री, चांदणी, पताका, रोषणाई करून  नाताळच्या स्वागताची तयारी झाली आहे. येथील विद्या स्कूलमध्ये नाताळच्या पार्टीचे आयोजन केले होते.

नाताळबाबा म्हणून बनून आलेल्या सांताक्‍लॉजसमवेत मुलांनी मौजमस्ती करून आंनद लुटला. ‘जिंगल बेल’सारखी नाताळ गीते सादर करण्यात आली. अंजली कुलकर्णी यांनी नातळ सणाचे महत्त्व सांगितले. मुलांनी ख्रिसमस ट्री भोवती फेर धरून नृत्य सादर केले. तरुणांनी या उपक्रमातून सामाजिक संदेश दिला.

पुणे

पिंपरी : "व्हायचे आहे जयांना या जगी मोठे त्या इमानी माणसांचे सोसणे चालू'' असे गझलकार शोभा तेलंग आपल्या गझलमध्ये व्यक्त...

07.21 PM

नवी सांगवी : येथील इंद्रप्रस्थ चौकातील शंकराचा पुतळा भाविकांचे श्रद्धास्थान होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने...

06.24 PM

पुणे : "बुद्धिभेद झालेल्या डोक्यात विज्ञानवाद पोचू शकत नाही. परंपारांच्या आधीन गेलेले मेंदू समोर दिसणाऱ्या लखलखीत वैज्ञानिक...

01.48 PM