क्‍लाउड ऍटलस झाला डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

पुणे - आतापर्यंत पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यात येणारा क्‍लाउड ऍटलस हा आता प्रथमच डिजिटल स्वरूपात आला आहे. त्यामुळे अतिसूक्ष्म पातळीवर जाऊन ढगांचा अभ्यास करणे शक्‍य होणार आहे. जागतिक हवामान दिन दरवर्षी 23 मार्चला साजरा केला जातो. या वर्षी "समज ढगांची' ही थीम आहे. या निमित्ताने भारतीय हवामान खात्यातील महासंचालक (उपकरण) राजेश माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

पुणे - आतापर्यंत पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यात येणारा क्‍लाउड ऍटलस हा आता प्रथमच डिजिटल स्वरूपात आला आहे. त्यामुळे अतिसूक्ष्म पातळीवर जाऊन ढगांचा अभ्यास करणे शक्‍य होणार आहे. जागतिक हवामान दिन दरवर्षी 23 मार्चला साजरा केला जातो. या वर्षी "समज ढगांची' ही थीम आहे. या निमित्ताने भारतीय हवामान खात्यातील महासंचालक (उपकरण) राजेश माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

जागतिक हवामान संघटनेने हा क्‍लाउड ऍटलस प्रसिद्ध केला आहे. 1987 पर्यंत पुस्तकाच्या स्वरूपात ते प्रकाशित केले जात असे. तीस वर्षांनंतर प्रथमच हा ऍटलस डिजिटल स्वरूपात अभ्यासकांपुढे येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्‍लाउड ऍटलसची सुरवात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी झाली असली तरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून प्रथमच क्‍लाउड ऍटलस डिजिटल स्वरूपात प्रकाशित करण्यात आला आहे. आतापर्यंत पुस्तकाच्या रूपात हा प्रकाशित केला जात असे. त्याच्यासाठी हवामान खात्यातील काही कर्मचाऱ्यांना ढगांच्या निरीक्षणाचे प्रशिक्षण दिलेले असते.

क्‍लाउड ऍटलस म्हणजे काय?
क्‍लाउड ऍटलस म्हणजे ढगांबाबतची सर्व माहिती संकलित करणारे पुस्तक. यात जगभरातील शंभराहून ढगांच्या प्रतिमांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त इंद्रधनुष्य, बर्फ, धुके, गारा यांचाही समावेश करण्यात आला आहे.

क्‍लाउड ऍटलसचा फायदा काय?
हवामानशास्त्रज्ञांना ढगांची सूक्ष्म स्वरूपातील माहिती यातून मिळणार आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या "क्‍लाउड ऍटलस'मुळे हवाई आणि जल वाहतूक अधिक सुरक्षित होणार आहे. ढगांची उंची, त्यातील पाण्याचे प्रमाण याची अद्ययावत माहिती वैमानिक आणि जहाजांवरच्या कॅप्टनला मिळते.

अशी होईल वाहतूक सुरक्षित
आकाशातून उड्डाण करताना किंवा खोल समुद्रातून जहाज चालविताना हवामान हा घटक महत्त्वाचा असतो. त्यातही ढग हा सर्वांत संवेदनशील घटक असतो. ढगांमधून विमान जाताना कित्येकवेळा ते वर-खाली होते. ढग कमी उंचीवर, मोठे आणि काळे असतील तर विमान प्रवासातील जोखीम वाढते; पण आता डिजिटल क्‍लाउड ऍटलसमुळे वैमानिक आणि कॅप्टनला नियमितपणे ढगांची अद्ययावत माहिती दिली जाते. त्या आधारावर काही वेळा विमानाच्या वेळाही बदलल्या जातात. तसेच, जहाजाचा मार्गही बदलावा लागतो.

ढगांचे प्रकार
1801 ते 1841 या दरम्यान लंडनमधील हवामानाच्या रेखाटलेल्या अभिलेखाच्या आधारे हॉवर्ड यांनी ढगांचे प्रमुख तीन प्रकार असल्याचे नमूद केले आहे. त्यात क्‍युमुलस, अलस्ट्रोटस आणि सिरस यांचा समावेश होतो. जमिनीपासून दोन हजार फुटांवर असलेल्या ढगांना "क्‍युमुलस' म्हटले जाते. ते मोठे आणि दाट असतात. दोन हजार ते सहा हजार फुटांवर "अलस्ट्रोटस', तर सहा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या ढगांना "सिरस' म्हटले जाते. हे ढग विरळ असतात.

हवामानातील ढगांचे स्थान
भविष्यातील हवामान आणि वातावरणाच्या अभ्यासात ढगांचे स्थान महत्त्वाचे राहणार आहे, त्यासाठी ढगांना ओळखणे, त्यांचे वर्णन करणे, त्यांना नाव देणे आणि वर्गीकरण करणे हा एक प्रमुख अभ्यास विषय राहणार आहे. ढग हे जलचक्र आणि संपूर्ण वातावरणातील प्रणाली चालविण्यास मदत करतात, त्यामुळे त्यांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. ढगांना समजून घेतल्यास त्याचा उपयोग हवामानाच्या स्थितीचा अंदाज बांधण्यासाठी, भविष्यातील वातावरण बदलाच्या संकेतासाठी आणि जल संसाधनाच्या उपलब्धतेसाठी करण्यात येईल.

हवामान दिनानिमित्त उद्या (ता. 23) शिवाजीनगर येथील सिमला ऑफिस नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या वेळी येथे प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे.

Web Title: cloud atlas digital