मुख्यमंत्र्यांना अपेक्षित पारदर्शी कारभार करू - नितीन काळजे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार करून या शहराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी महापौर निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना दिली. 

पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार करून या शहराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी महापौर निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना दिली. 

महापौर काळजे म्हणाले, ""आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात जाती-पातीच्या राजकारणाला थारा दिला नाही. आम्हाला यापुढे भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीनुसार विकासाचे राजकारण करायचे आहे. या शहराला भय आणि भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कामकाजात अपेक्षित असलेला पारदर्शी कारभार आम्ही करणार आहोत; तसेच पिंपरी- चिंचवड शहराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.'' 

काळजे म्हणाले, ""पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या ऐतिहासिक परिवर्तनात शहराचा भाजपचा पहिला महापौर होण्याचा सन्मान मला मिळाला. गेल्या 20 वर्षांपासून समाविष्ट गावांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले होते. या गावांना कायम सापत्न वागणूक मिळाली. महापालिकेत सत्ता येऊद्या, मी समाविष्ट गावातच महत्त्वाचे पद देतो, हा महेश लांडगे यांनी दिलेला शब्द आज त्यांनी खरा करून दाखवला. त्यामुळे आज मला महापौरपदाची मिळालेली संधी म्हणजे समाविष्ट गावांचा सन्मान आहे. विधानसभा निवडणुकीत समाविष्ट गावांना न्याय मिळवून देणार असा शब्द महेश लांडगे यांनी दिला होता. त्या वेळी चऱ्होली, मोशी, दिघी, चिखली आणि तळवडे आदी परिसरातील नागरिकांनी आमदार लांडगे यांच्यावर विश्वास दाखवला. गेल्या अडीच वर्षांच्या काळात समाविष्ट गावांत विकासकामे केल्यामुळेच पुन्हा महापालिका निवडणुकीत येथील नागरिक भाजपच्या पाठीशी राहिले.'' 

काळजे म्हणाले, ""समाविष्ट गावांत आजही अनेक सुविधांची वानवा आहे. रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पाणी समस्या निकालात काढण्यासाठी मी आग्रही भूमिका घेणार आहे. त्यामुळे या विकासाच्या वाटचालीत मी यशस्वी ठरणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.'' 

महापौर नितीन काळजे अल्प परिचय -

नाव : नितीन प्रताप काळजे 
जन्मतारीख : 10 मार्च 1974 
निवास : चऱ्होली बुद्रुक, काळजेवाडी. 
व्यवसाय : शेती 
शिक्षण : 11 वी 
व्यक्तिगत माहिती : अविवाहित 
राजकीय कारकीर्द : 
* 2012 च्या निवडणुकीत पहिल्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेवक 
* 2017 च्या निवडणुकीत भाजपतर्फे नगरसेवक (प्रभाग 3-अ) पदापाठोपाठ महापौरपदी निवड 
* अध्यक्ष, भैरवनाथ मित्रमंडळ (काळजेवाडी, चऱ्होली) 
- सामाजिक कार्य : 
* शेती, पाणीपुरवठा नियोजनाबाबत काम 
* मोफत रुग्णवाहिका सेवा, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत 
* आर्थिक, मागासवर्गीय रुग्णांना वैद्यकीय मदत 

उपमहापौर अल्प परिचय -  
नाव : शैलजा अविनाश मोरे 
निवास : पेठ क्रमांक 28, निगडी-प्राधिकरण 
जन्मतारीख : 12 नोव्हेंबर 1960 
शिक्षण : नववी 
राजकीय कारकीर्द : महापालिका निवडणुकीत भाजपतर्फे प्रथमच नगरसेविका (प्रभाग 15-ब) 
सामाजिक कार्य : 
* भाजपच्या (संभाजीनगर) संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कार्यक्रम 
* विविध महिला मंडळ, बचतगटांच्या माध्यमातून काम 
* ज्येष्ठ नागरिक संघ आणि विविध सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून उपक्रम 
* निगडी परिसरात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप कार्यक्रम 

पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर 
महापौर कालावधी 
ज्ञानेश्‍वर लांडगे 27 मार्च 1986 ते 19 मार्च 1987 
भिकू वाघेरे 20 मार्च ते 6 जून 1987 
अरविंद ऊर्फ नाना शितोळे 19 जून 1987 ते 19 मार्च 1988 
तात्या कदम 19 मार्च 1988 ते 20 मार्च 1989 
कविचंद भाट 20 मार्च 1989 ते 20 मार्च 1990 
सादबा काटे 20 मार्च 1990 ते 20 मार्च 1991 
प्रभाकर साठे 20 मार्च 1991 ते 7 मार्च 1992 
आझम पानसरे 7 मार्च 1992 ते 20 मार्च 1993 
विलास लांडे 20 मार्च 1993 ते 19 मार्च 1994 
रंगनाथ फुगे 19 मार्च 1994 ते 20 मार्च 1995 
संजोग वाघेरे 20 मार्च 1995 ते 21 मार्च 1996 
आर. एस. कुमार 21 मार्च 1996 ते 13 मार्च 1997 
अनिता फरांदे 13 मार्च 1997 ते 20 मार्च 1998 
हनुमंत भोसले 20 मार्च 1998 ते 20 मार्च 1999 
मधुकर पवळे 20 मार्च 1999 ते 24 नोव्हेंबर 2000 
लक्ष्मण जगताप 19 डिसेंबर 2000 ते 13 मार्च 2002 
प्रकाश रेवाळे 13 मार्च 2002 ते 18 फेब्रुवारी 2005 
मंगला कदम 18 फेब्रुवारी 2005 ते 13 मार्च 2007 
डॉ. वैशाली घोडेकर 13 मार्च 2007 ते 23 मे 2008 
अपर्णा डोके 6 जून 2008 ते 30 नोव्हेंबर 2009 
योगेश बहल 1 डिसेंबर 2009 ते 13 मार्च 2012 
मोहिनी लांडे 13 मार्च 2012 ते 12 सप्टेंबर 2014 
शकुंतला धराडे 12 सप्टेंबर 2014 ते 13 मार्च 2017 
नितीन काळजे 14 मार्च 2017 पासून 

Web Title: CM due to transparent management