मावळवाटांनी पांघरली रानफुलांची शाल

flowers
flowers

तळेगाव स्टेशन (पुणे) : शरद ऋतूच्या आगमनानंतर हिरव्या शालू बहरलेल्या सह्यकड्यांतील मावळवाटा आणि पठारांना केशरी पिवळ्या सोनकुसुम अर्थात कॉसमॉससह विविध प्रकारच्या रंगीबेरंगी रानफुलांनी अक्षरशः गराडा घातला आहे.हिरव्या शालुने बहरलेल्या मावळवाटांना रानफुलांचे कोंदण लागलेली मावळची ही कास पठारे जणू पर्यटकांना खुणावत आहेत.

मावळातल्या डोंगरदऱ्या,रस्त्याकडेच्या मोकळ्या जागा,पठारे,पडीक शेते,शेताचे बांधच काय तर सध्या अगदी मोकळी जागाही दिसणार नाही इतपत सर्वव्यापी आणि मुबलक प्रमाणात फुललेली दिसतात. विविधरंगी भुंगे, मधमाश्या आणि फुलपाखरांच्या संगतीने सोनकुसुम, घाणेरी, कुर्डू अर्थात कोंबडा, रानझेंडू, निळी रान अबोली, सोनकी, उंदीरमारी, मशिपत्री, रुई, नागदौणा, रानहळद, तेरडा, आघाडा, गणेशवेल, ऑर्किड, दशमुळी, अग्निपंख, शंकासूर, कारवी, आरटी, सोनतराड आणि नाना तऱ्हेची विविध रंगछटांची रानफुले वाऱ्यावर डोलताना पर्यटक आणि पुष्पअभ्यासकांना जणू साद घालत असावीत.जवळपास महिनाभर चालणारा हा मावळचा फुलोत्सव पाहण्यासाठी आपणाला कुणाला रस्ता विचारण्याची गरज नाही.देहूरोडपासून जुना-पुणे मुंबई महामार्ग,तळेगाव-चाकण महामार्गाच्या दुतर्फा कुठेही उतरुन थोडेसे आत गेले कि रानफुलांचे अनोखे निसर्गचित्र डोळयांचे पारणे फेडते.

भंडारा डोंगरावर लाल (कुंकू), पिवळी,गुलाबी, पांढरी, केशरी अशी विविध रंगछटांची टणटणी अर्थात घाणेरी एकाच ठिकाणी पाहावयास मिळते. खेड-मावळच्या सीमेवरील वरसुबाईची डोंगररांग असो की कामशेत ते जांभिवलीपर्यंत, खांडी, कुसूर, पवनानगर आणि ठोकळवाडी जलाशयाचा परीघ जिकडे तिकडे चोहीकडे फुललेल्या रानफुलांमुळे सह्यकड्यांवर जणू फुलोत्सव रंगल्याचे चित्र आहे. दवबिंदूंची दुलई पांघरलेल्या हिरवाईवर अगदी शिंपडल्यागत पसरलेली ही रंगीबेरंगी रानफुले, सोनेरी उन्हात ताणतणाव दूर करुन मनात चैतन्य पेरण्याचे काम करतात. मनाला ऊर्जेने भरण्याचे काम करतात. नवरात्रीच्या नांदीला आसमंतात दरवळणारा हा बेधुंद रानफुलांचा मनमोहक सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला मावळवाटांनी भल्या सकाळीच निघायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com