सुरू विकासकामे पूर्ण करा

सुरू विकासकामे पूर्ण करा

पुणे - महापालिकेत गेल्या पाच वर्षांत दिमाखात वावरणारे आणि वेगवेगळ्या कार्यालयांत आपली उपस्थिती जाणवून देणारे नगरसेवक निरोपाच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत हळवे झाले... ‘आमची कधी काही कामे असतील तर मदत करा, आयुक्तसाहेब, आमच्या प्रभागातील सुरू असलेली विकासकामे पूर्ण करा...,’ अशी विनंती करीत नव्या सभागृहात संधी न मिळालेल्यांनी चेहऱ्यावर खंत न दाखवता हसऱ्या चेहऱ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात परस्परांचा आणि महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला.  

महापालिकेच्या सरत्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. या सभेला सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे म्हणून महापौर प्रशांत जगताप यांनी आवर्जुन सगळ्यांशी संपर्क साधला होता. साडेअकरा वाजता सुरू झालेली निरोपाची सभा चार वाजेपर्यंत सुरू होती. निरोप घेताना सहकार्य केलेल्या अधिकाऱ्यांचे आभार मानतानाच राजकीय विरोधकांना चिमटे काढण्याची संधीही काही सदस्यांनी सोडली नाही. तर, महापालिका निवडणुकीत बदलेल्या राजकीय वातावरणाचे आणि पक्षांतराचे संदर्भ देत सभेचे कामकाज रंगले. एरवी सभागृहात उपस्थिती जाणवून देणारे भाजपचे गटनेते गणेश बिडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते सुभाष जगताप, तसेच आबा बागूल, अश्‍विनी कदम यांची अनुपस्थिती जाणवली; तर कमल व्यवहारे, अभय छाजेड या ज्येष्ठांना या वेळी निरोप देण्यात आला. 

या सभेत अशोक येनपुरे, धनंजय जाधव यांनी आभार मानताना पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव घेतल्यावर सभेत भाजप वगळता उर्वरित राजकीय पक्षांच्या सदस्यांनी टीका-टिप्पणी केली. तर किशोर शिंदे, बाबू वागस्कर, दीपक मानकर, अविनाश बागवे, अस्मिता शिंदे, रूपाली पाटील, नंदा लोणकर, मीनल सरोदे, यांच्या भाषणात ईव्हीएम आणि मोदी लाटेचे पडसाद उमटले. उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी, ‘पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारून पुन्हा कामाला सुरवात केली आहे,’ या वक्तव्याला सदस्यांनी बाके वाजवून प्रतिसाद दिला. पक्षाने उमेदवारी नाकारल्याची खंत काही जणांनी व्यक्त केली, तर ‘सग्या-सोयऱ्यांच्या हट्टामुळे उमेदवारी डावलली गेली’, असे म्हणत सतीश म्हस्के यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ तसेच वसंत मोरे यांनी प्रभाग रचनेपासूनच विरोधकांनी आपल्याला कसा त्रास दिला, याची उदाहरणे सांगितली. छाजेड, व्यवहारे यांनी प्रदीर्घ काळात काम करताना आलेले अनुभव या वेळी कथन केले. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सामोपचाराची भूमिका घेण्याचे आवाहन केले. विरोधकांचे हल्ले शिताफीने परतविणारे भाजपचे येनपुरे, श्रीनाथ भीमाले, स्मिता वस्ते, माधुरी सहस्रबुद्धे यांनीही खेळीमेळीच्या वातावरणात चिमटे काढले. मीनल सरोदे, धनंजय जाधव, मनीषा घाटे, संजय बालगुडे आदींचीही या वेळी भाषणे झाली. 

महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘राजकीय पार्श्‍वभूमी नसतानाही शहराचे महापौरपद मिळाले हे माझे भाग्य आहे. या पदावर आणि सभागृहात असताना सर्व सहकाऱ्यांचे अनमोल सहकार्य मिळाले. त्याच्या बळावर या पदावर सक्षमरित्या काम करता आले. मात्र, निवडणुकीच्या निकालाचा कौल मान्य करून आता पुन्हा नव्याने कामाला लागण्याची गरज आहे. संधी पुन्हा पुन्हा येत असते. जीवनाच्या वाटचालीत काही प्रश्‍नांना ‘फुली’ मारावी लागते, ज्यामुळे पुढील वाटचाल शक्‍य होईल. त्यातूनच नवी उमेद घेता येणार आहे.’’

बंडू केमसे म्हणाले, ‘‘सभागृहात गेली दहा वर्षे काम करताना अनेक घटकांचे सहकार्य मिळाले. राजकीय द्वेष न ठेवता अनेक जण शहराच्या हितासाठी एकत्र आलो. सामूहिक प्रयत्नांमधून विकासाच्या योजना राबविता आल्या. राजकीय अपरिहार्यता म्हणून आरोप-प्रत्यारोपही झाले. पण, त्याचा नागरिकांच्या हिताच्या योजनांवरही परिणाम न होण्याची काळजी प्रत्येकाने घेतली. या पुढील काळातही अशाच प्रकारचे कामकाज व्हावे.’’

एसके पॅटर्न, भविष्यवाणी आणि ईव्हीएम 
शहरातील ‘एसके पॅटर्न’बद्दल पुष्पा कनोजिया यांनी नाराजी व्यक्त केली, तर धनशक्तीपुढे विकासकामे वाहून गेल्याचे काही सदस्यांनी सांगितले. लाट मोदींची असेल तर स्वयंघोषित ज्योतिषी भविष्यवाणी कसे वर्तवितात, असा प्रश्‍न काही जणांनी उपस्थित केला. यापुढे महापालिकेतील पारदर्शक कारभाराकडे, स्थायी समितीमधील स्वच्छतेबाबत आमचेही पुणेकर नागरिक म्हणून लक्ष असेल, त्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगत काही सदस्यांनी भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com