बापट परत या...तुम्हाला कोणीही रागावणार नाही!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 मे 2017

'काँग्रेसने या कारभाराचा आता फलकाद्वारे समाचार घेतला आहे. बापट साहेब परत या,' अशी टॅगलाइन वापरून शहरात अनेक ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे बापट यांची अनुपस्थिती हा शहरात साहजिकच चर्चेचा विषय ठरला आहे.

पुणे - ''पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आपण परत या, पुण्याचा प्रश्‍न मिटला आहे.....तुम्हाला कोणी काही रागवणार नाही, फक्त तुम्ही परत या,'' असे उपरोधिक फलक पुण्यात काँग्रेस पक्षाने लावले आहेत. आधीच्या सत्ताधारी पक्षावर भाजपने अशीच टीका केली होती. आता तशीच टीका सहन करण्याची वेळ भाजप नेत्यांवप आली आहे. मोक्‍याच्या वेळी पालकमंत्री शहरात नसल्याची बोच याद्वारे प्रगट झाली आहे.

पुण्यात कचराकोंडी निर्माण व्हायला आणि बापट हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडच्या दौऱ्यावर जायला एकच गाठ पडली. बापट हे संसदीय कामकाजमंत्री आहेत. विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी, ज्येष्ठ मंत्री, आमदार यांचे शिष्टमंडळ या दोन देशांच्या दौऱ्यावर आहे. बापट हे सहकुटुंब दौऱ्यावर आहेत. ते पुढील आठवड्यात पुण्यात येण्याची शक्‍यता आहे. याच काळात पुण्याचा कचरा हा कचरा डेपोत टाकायला फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थांनी विरोध केला. त्यामुळे शहरातील कचरा उचलला जात नव्हता.

शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचले होते. माध्यमांतून हा विषय जोरात लावून धरण्यात आला. विरोधकांनी पालिकेत आंदोलने केली. मात्र, याच काळात महापौर मुक्ता टिळकही परदेशात असल्याने सत्ताधारी पक्षाचे जबाबदार नेते निर्णय घेण्यासाठी शहरात नव्हते. त्यामुळे शहराला कोणी वालीच नसल्याची भावना निर्माण झाली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी या प्रश्‍नात लक्ष घालावे, अशी मागणी केली. त्या स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटल्यानंतर सात मे रोजी या संदर्भात पुण्यात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्यातून या समस्येवर तोडगा काढण्यात आला. गावकऱ्यांच्या मागण्या एका महिन्यात पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर कचराकोंडी फुटली. मात्र पुणे या काळात नेतृत्त्वहीन झाल्याचे चित्र निर्माण झाले.

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील बित्तंबातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बापट यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचाही कारभार आहे. याच काळात तूर खरेदीचा मुद्दा विरोधकांनी आक्रमकपणे मांडला. शेतकऱ्यांची तूर स्वस्तात सरकार खरेदी करत असताना ही तूर पुरवठा यंत्रणेद्वारे नागरिकांना स्वस्तात सध्या मिळत नाही. बापट हे पुरवठामंत्री म्हणून त्यांच्यावर या तुरीची जबाबदारी असल्याचा मुद्दा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला. त्यामुळे चव्हाण यांनीही बापट यांना तातडीने परदेशातून माघारी बोलवा, अशी मागणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

'काँग्रेसने या कारभाराचा आता फलकाद्वारे समाचार घेतला आहे. बापट साहेब परत या,' अशी टॅगलाइन वापरून शहरात अनेक ठिकाणी हे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे बापट यांची अनुपस्थिती हा शहरात साहजिकच चर्चेचा विषय ठरला आहे.