पुण्यात ठाकरे कलामंदिराचे काम संथ गतीने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या जागेतच बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. वीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, आतापर्यंत 10 कोटी रुपये खर्च झाले आहेत. कलामंदिराची इमारत बांधून झाली. मात्र आतील कामे अद्यापही पूर्ण नाहीत. दुसऱ्या टप्प्यातील पार्किंगची इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. पण त्याबाबतही काहीच हालचाल नाही. 

महापालिकेच्या भवन रचना विभागामार्फत 2015 मध्ये कलामंदिराच्या बांधकामाला सुरवात झाली. विभागाला प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षांत चार-चार कोटी त्यानंतर एक कोटी अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने रक्कम उपलब्ध झाली. जोपर्यंत पुरेशी आर्थिक तरतूद होत नाही, तोपर्यंत कामकाज संथ गतीनेच चालणार, असे प्रशासकीय अधिकारी सांगतात.

कलामंदिराच्या इमारतीमधील रेंगाळलेली कामे पुढील तीन-चार महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असे सांगण्यात आले. नाट्यगृहाच्या पायऱ्या अशास्त्रीय पद्धतीने बांधल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम रेंगाळले आहे. बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचत असल्याचे प्रेक्षक सांगतात. कलामंदिर यंदा सुरू झाले तरी प्रस्तावित पार्किंगच्या इमारतीचे बांधकाम पुढील वर्षी सुरू होईल, असेही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नाट्यगृहाच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष टाळले तर बरे होईल. मुख्यता स्वच्छतागृह, दरवाजे यांची किरकोळ दुरुस्तीची कामेसुद्धा वेळेवर होत नसल्याने प्रेक्षकांना त्रास होतो. 
- धनंजय झुरंगे, प्रेक्षक 

प्रत्येक कलाकाराच्या यशामध्ये नाट्यगृहाचा वाटा आहे. कलाकार त्यांचे घर जसे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतात, तसेच नाट्यगृहाची स्वच्छता राखणे हे देखील कलाकारांचे कर्तव्य आहे. केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. वस्तुतः नाट्यगृहाची स्वच्छता ठेवणे ही कर्मचारी व कलाकार दोघांचेही कर्तव्य आहे. कारण नाट्यगृहांवर आपली सर्वांचीच श्रद्धा आहे. 
- डॉ. सलिल कुलकर्णी, संगीतकार

Web Title: Construction of Balasaheb Thackray art gallery still not completed