मार्चअखेर... पोस्टाचे पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' ! 

representational image
representational image

पुणे : करबचतीच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये टपाल खात्यात (पोस्ट) नव्या संगणकीय प्रणालीचे काम हाती घेतले गेल्याने गुंतवणूकदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामाचा ताण आणि कमी मनुष्यबळाबरोबरच नव्या संगणक प्रणालीसाठी अद्याप न सरावलेला आणि निवृत्तीकडे झुकलेला कर्मचारीवर्ग, धनादेश 'क्‍लिअरिंग'मधील विस्कळितपणा या सर्वांचा विपरीत परिणाम पोस्टातील गुंतवणुकीवर होताना दिसत आहे. 

दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पोस्टात कोअर बॅंकिंग सोल्यूशन (सीबीएस) कार्यान्वित करण्याच्या निमित्ताने असाच त्रास गुंतवणूकदारांना सहन करावा लागला होता. त्या वेळी 'सकाळ'ने या विषयाला वाचा फोडली होती. त्या वेळी केंद्र सरकारने दखल घेऊन मार्चअखेरीस हा विषय मार्गी लावला होता. आज पुन्हा दोन वर्षांनी पोस्टाचे 'ये रे माझ्या मागल्या' सुरू झाल्याचे चित्र आहे. 

पोस्टात आधुनिकीकरणाचे वारे जोरात वाहू लागले असून, आता पोस्टाची संपूर्ण व्यवस्था कोअर सिस्टिम्स इंटिग्रेशनने (सीएसआय) जोडली जात आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या कामात सुसूत्रता येणार आहे. या आधुनिकीकरणाला कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, त्याचे काम आर्थिक वर्षाच्या सुरवातीला हाती घेण्याऐवजी शेवटच्या घाईगडबडीच्या महिन्यात हाती घेतल्याने अल्पबचत योजनांतील गुंतवणूकदारांना आणि अन्य ग्राहकांना त्याचा फटका बसत असल्याची माहिती काही गुंतवणूकदार आणि अल्पबचत प्रतिनिधींनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

यासंदर्भात अल्पबचत व महिला प्रधान बचत प्रतिनिधींच्या संघटनेचे कोशाध्यक्ष कौस्तुभ ठकार म्हणाले, ''पोस्टातील बचत योजनांवर असंख्य नागरिकांचा विश्‍वास आहे. मार्चमध्ये अनेकजण एनएससी, पीपीएफ यांसारख्या करबचतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतात. पण, याच महिन्यात संगणक प्रणालीच्या सुधारणेचे काम हाती घेतल्याने अडचणी निर्माण होत आहेत. सध्या हा अनुभव अनेकांना येत आहे. पोस्टात प्रत्यक्ष येऊन गुंतवणूक करण्यास बरेच नागरिक इच्छुक नसतात. त्यामुळे प्रामुख्याने अल्पबचत प्रतिनिधींमार्फत ही गुंतवणूक होत असते. मार्चच्या सुरवातीलाच सुमारे आठवडाभर नव्या गुंतवणुकीचे धनादेश स्वीकारलेच गेले नाहीत. त्यानंतर स्वीकारल्या गेलेल्या सर्व धनादेशांच्या 'क्‍लिअरिंग'ची माहिती बऱ्याच छोट्या पोस्टांपर्यंत पोचलेली नाही. काही गुंतवणूकदारांच्या बॅंक खात्यातून धनादेशाचे पैसे वळते झाले नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपली गुंतवणूक 31 मार्चच्या आत झाली आहे की नाही, आपल्याला करसवलतीचा लाभ मिळणार आहे की नाही, अशी चिंता त्यांना वाटत आहे.'' 

नव्या सिस्टीममुळे पोस्टात मध्यंतरी थोड्या अडचणी येत होत्या. पण, आता परिस्थिती बिकट राहिलेली नाही. क्‍लिअरिंगमध्ये थोडा वेळ लागत होता. पण, आता काम सुरळीतपणे होऊ लागले आहे. अपवादात्मक ठिकाणी काही समस्या असू शकतील, पण त्या सोडविल्या जातील. 
- गणेश सावळेश्‍वरकर, पोस्ट मास्टर जनरल (पुणे क्षेत्र) 

गुंतवणुकीवर परिणाम होणार 
पोस्टाच्या योजना चांगल्या आणि सुरक्षित आहे. मात्र, तेथील कार्यपद्धतीमुळे अनेकजण त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडासारख्या अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे. त्यामुळे पोस्टातील गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. 

  • आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये अल्पबचतीच्या गुंतवणुकीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर 
  • महाराष्ट्रातून तब्बल 34,223.87 कोटी रुपयांची गुंतवणूक 

बचत खात्याचे बंधन 
पोस्टातील विविध योजनांच्या मुदतपूर्तीचे पैसे पूर्वी धनादेशाद्वारे दिले जात असत. तेही आता बंद झाले असून, मुदतपूर्तीचे हे पैसे पोस्टातीलच बचत खात्यात जमा करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे पोस्टात आधी बचत खाते उघडण्यावाचून नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. याचाही ताण कर्मचाऱ्यांवर येत आहे.

कर्मचारीही वैतागले... 
पोस्टात मनुष्यबळ कमी असून, जे सध्या कार्यरत आहेत, त्यातील बहुतांश कर्मचारी निवृत्तीच्या जवळ पोचले आहेत. त्यांना नवनव्या संगणकीय प्रणालीशी जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत. नव्या पद्धतीतील कोडिंग सिस्टिम किचकट असल्याचे समजते. संगणकीय प्रणालीतील अडचणींचा सामना सातत्याने करावा लागत असल्याने कर्मचारीही वैतागले आहेत. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतरही काहींना उशिरापर्यंत थांबावे लागत आहे. काही कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी करूनही ती स्वीकारली जात नसल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com