नगरसेवकांनी घेतले मोरयांचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेत येण्यापूर्वी चिंचवड येथील मोरया गोसावींचे दर्शन घेतले. त्यानंतर चापेकर वाड्यात जाऊन चापेकर बंधूंना अभिवादन केले. त्यानंतर ते थेट महापालिका भवनात दाखल झाले. 

पिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी महापालिकेत येण्यापूर्वी चिंचवड येथील मोरया गोसावींचे दर्शन घेतले. त्यानंतर चापेकर वाड्यात जाऊन चापेकर बंधूंना अभिवादन केले. त्यानंतर ते थेट महापालिका भवनात दाखल झाले. 

सकाळी नऊ वाजता मोरया गोसावी मंदिराजवळ भाजपचे सर्व नगरसेवक जमण्यास सुरवात झाली. आलेल्या सर्व नगरसेवकांना भगवा फेटा बांधण्यात येत होता. प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या जाऊन मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर दहाच्या सुमारास आमदार महेश लांडगे यांचे आगमन झाल्यानंतर सव्वादहाच्या सुमारास पायी चापेकर वाड्याकडे चालत गेले. चापेकर वाड्यात गेल्यावर सर्व नगरसेवकांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. सकाळी पावणे अकराच्या सुमारास सर्व नगरसेवकांचे पिंपरी- चिंचवड महापालिकेत आगमन झाले. 

बैलगाडीतून प्रवेश 
भगवा फेटा बांधलेल्या सर्व नगरसेविका पुढे आणि त्यांच्या मागे बैलगाडीत आमदार महेश लांडगे व नियोजित महापौर नितीन काळजे होते; तसेच चऱ्होली परिसरातील काळजे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने महापालिका भवनात उपस्थित होता. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. 

पालकमंत्र्यांची अनुपस्थिती 
चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात; तसेच चापेकर वाड्यात पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे व आझम पानसरे यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. फक्‍त भोसरीचे आमदार महेश लांडगे हेच उपस्थित होते. अनुपस्थितीबाबत उलटसुलट चर्चा रंगली होती. 

नगरसेविकांची "फोटोक्रेझ' 
मोरया गोसावी मंदिर परिसरात भगवा फेटा बांधल्यानंतर बहुतांश सर्वच नगरसेविका फोटो काढून घेण्यात; तसेच सेल्फी काढण्यात मग्न असल्याचे दिसून आले. प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविकांना सभागृहातही आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. 

वाहतूक कोंडीचा त्रास 
मोरया गोसावी समाधी मंदिराकडून चापेकर वाड्याच्या दिशेने नगरसेवक चालत गेले. मात्र, त्यांच्यामागे त्यांच्या वाहनांचा ताफा असल्याने या भागात जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाली; तसेच महापालिका भवनात महापौर, उपमहापौर व त्यांचे समर्थक आल्याने मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली होती. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. 

Web Title: Corporator took Morya darshan