नगरसेवक झाले विद्यार्थी

नगरसेवक झाले विद्यार्थी

पुणे - सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्र येण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महापालिका; पण महापालिकेच्या बाहेर सर्व नगरसेवक एकत्र आले... आपला पक्ष, एकमेकांतील विरोधाची भावना बाजूला ठेवून आणि मनात पुण्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन. हा विकास साधण्यासाठी कुठली पावले उचलली पाहिजेत, नगरसेवक म्हणून कोणती कर्तव्ये पार पाडली पाहिजेत... हे नगरसेवक विद्यार्थी होऊन शिकत होते.

यंदा ९० हून अधिक नव्या नगरसेवकांनी महापालिकेत पाऊल ठेवले आहे. त्यांच्याबरोबरच जुने, अनुभवी नगरसेवक ‘सकाळ’च्या सोमवारी झालेल्या स्नेहमेळाव्यात एकत्र आले होते. सर्व पक्षांचे नगरसेवक यात सहभागी झाले होते. स्नेहमेळाव्यातील मार्गदर्शनपर व्याख्यानात कुठले मुद्दे ऐकायला मिळणार, कुठल्या विषयावर चर्चा होणार, याची उत्सुकताही अनेक नगरसेवकांच्या चेहऱ्यावर जाणवत होती.

निवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा यांनी नगरसेवकांची कर्तव्ये आणि महापालिकेत आल्यानंतर कामकाजाची पद्धत आपल्या व्याख्यानातून सविस्तर मांडली. ते सांगत असलेले प्रत्येक मुद्दे नगरसेवक लिहून घेत होते. तर काही नगरसेवक आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून घेत होते. झा यांच्याबरोबरच महापौर मुक्ता टिळक, ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनीही नगरसेवकांशी मुक्त संवाद साधला. ‘नगरसेवकांकडून पुण्याच्या अपेक्षा’ या विषयावर तयार करण्यात आलेल्या लघुपटाने स्नेहमेळाव्याचा समारोप करण्यात आला.

ॲप येणार मदतीला
‘सकाळ’च्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या वतीने ‘मस्केटियर ॲप’ विकसित करण्यात आले आहे. या ॲपचे सादरीकरण स्नेहमेळाव्यात करण्यात आले. फाउंडेशनचे शुभ्रजित घडई म्हणाले, ‘‘वाटेत गाडी बंद पडणे, अपघात होणे, आग लागणे... अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यानंतर त्या वेळी या ॲपद्वारे गरजूंना तत्काळ मदत मिळू शकते. आपण अडचणीत असल्यास जवळच्या व्यक्तीला संदेश जाऊ शकतो. शिवाय, १० सेकंदांची क्‍लिपही पाठवता येऊ शकते. ती जवळच्या व्यक्तींबरोबरच मदतीसाठी पोलिस, रुग्णवाहिका यांनाही पाठवता येते. या ॲपचा पुणेकरांना फायदा होईल.’’

नगरसेविका म्हणून मी पहिल्यांदाच महापालिकेत आली आहे. वेगवेगळी आव्हाने समोर उभी आहेत. अशा स्थितीत झालेले हे मार्गदर्शन आम्हा नगरसेवकांना खूप काही शिकवणारे ठरले. यामुळे कामाचा उत्साहही वाढला आहे.
- दिशा माने

नगरसेविका म्हणून कुठली कामे केली पाहिजेत, कुठल्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे आणि कामाची पद्धत कशी असते, हे ‘सकाळ’च्या या उपक्रमात समजून घेता आले. त्यामुळे हा उपक्रम मला एक महत्त्वाचा टप्पा वाटतो.
- पल्लवी जावळे

प्रभागात काम करताना या स्नेहमेळाव्यात सांगितलेल्या मुद्द्यांचा मोठा फायदा होणार आहे. आम्हाला मतदारांनी संधी दिली आहे. ती विकासाच्या कामांमधून सार्थ करून दाखवू. त्यासाठी या मार्गदर्शनामुळे नवे बळ मिळाले आहे.
- किरण जठार

कामाचे नियोजन कसे करावे, अर्थसंकल्प कसे सादर करावे, योजना कशा आखाव्यात... अशा किती तरी गोष्टी या कार्यक्रमात शिकता आल्या. या शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष काम करताना उपयोगी ठरणार आहेत.
- आदित्य माळवे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com