अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला वेग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

महिनाभरात नव्याने झालेल्या सुमारे ७० मिळकतींवर कारवाई
पिंपरी - शहरामध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या काळात थंडावलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला आता पुन्हा वेग येऊ लागला आहे. गेल्या महिनाभरात नव्याने झालेल्या सुमारे ७० अनधिकृत बांधकामांवर महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली आहे.

शहरामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण होते. त्या कालावधीत महापालिकेचा कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात गुंतलेला होता. त्याचा फायदा घेऊन नागरिकांनी शहरात विविध भागात नव्याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत अनधिकृत बांधकामांच्या विरोधात तुरळक स्वरूपाची कारवाई वगळता मोठी कारवाई झाली नाही. मार्च महिन्यात मात्र पुन्हा अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने अद्याप अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जुन्या अनधिकृत बांधकामांच्या बाबतीतही कारवाई होण्याची भीती नागरिकांमध्ये कायम आहे. सद्य:स्थितीत महानगरपालिकेकडून नव्याने झालेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.
 
पालिकेने केलेली कारवाई (डिसेंबर २०१६ अखेर)
बजावलेल्या नोटिसा : ४६ हजार ८४६
कारवाई : २२२०
दाखल फौजदारी गुन्हे : २४९९

महापालिकेच्या वतीने सध्या नव्याने झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. राज्य शासनाकडून अनधिकृत बांधकामांबाबत लागू होणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल.
- मकरंद निकम, कार्यकारी अभियंता.

Web Title: crime on illegal construction