मोदी सरकार केवळ "नेम चेंजर' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे - कोणतीही नवीन योजना भाजप सरकारने लोककल्याणासाठी सुरू केली नाही; तर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाने कॉंग्रेस सरकारने सुरू केलेल्या योजनांची नावे बदलण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. त्यामुळे हे सरकार "गेम चेंजर' नसून "नेम चेंजर' आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली. 

कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ बोपोडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शरद रणपिसे, हुसेन दलवाई, शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

पुण्याच्या पाच वर्षांचा विचार केला नाही, तर देश आणि राज्यापेक्षा पुण्याची स्थिती वाईट होईल, असे सांगत चव्हाण यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, ""धर्मांध शक्तींना बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी केली आहे. भाजपने नेहमीच भावनिक प्रश्‍न निर्माण करून मतांचे राजकारण केले आहे. राम मंदिर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. डॉ. मनमोहन सरकारने पुण्याला भरीव निधी दिला. त्याच आधारावर पुण्यात कॉंग्रेसने विकास केला. या सरकारने फक्त घोषणा केल्या आहेत.'' 

नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) वारंवार निर्णय बदलले आहेत. त्यामुळे "आरबीआय' ही "आरएसएस'ची शाखा आहे की काय, असे वाटण्याइतपत स्थिती निर्माण झाली होती, असेही चव्हाण यांनी सांगितले. 

भाजपचे मंत्री जाहीरपणे कबूल करत आहेत की, हा गुंडांचा पक्ष आहे, याचा दाखला देत ते म्हणाले, ""गुंडांना राजाश्रय देण्याचे काम भाजप करत आहे. या गुंडांना स्वच्छ करण्यासाठी आता भाजपने वॉशिंग मशिन घ्यावी.'' 

आणि वाटून खाऊ 
भाजप-शिवसेनेचे भांडण हे दोन बोक्‍यांचे भांडण असून, ते सत्तेचा लोण्याचा गोळा खाण्यासाठी आहे. 23 फेब्रुवारीनंतर "आपण दोघे भाऊ-भाऊ आणि वाटून खाऊ' अशी त्यांची भूमिका असेल, अशा शब्दांत चव्हाण यांनी खिल्ली उडविली.

Web Title: Criticism of MP Ashok Chavan