‘क्रॉस व्होटिंग’मधून ठरला कल

- अनिल सावळे 
रविवार, 12 मार्च 2017

प्रभाग २६ : महंमदवाडी-कौसरबाग 

महंमदवाडी-कौसरबाग प्रभागातून शिवसेनेला दोन, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. ‘राष्ट्रवादी’चे माजी नगरसेवक फारुख इनामदार यांनी या भागात विकासकामे केली; परंतु त्यांना दोन प्रभागांतून निवडणूक लढविण्याच्या निर्णयाची किंमत मोजावी लागली. शिवसेनेचे नाना भानगिरे यांनी ६७ मतांनी निसटता विजय मिळविला. या प्रभागात ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान न होता ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याचे निकालावरून लक्षात येते. 

प्रभाग २६ : महंमदवाडी-कौसरबाग 

महंमदवाडी-कौसरबाग प्रभागातून शिवसेनेला दोन, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. ‘राष्ट्रवादी’चे माजी नगरसेवक फारुख इनामदार यांनी या भागात विकासकामे केली; परंतु त्यांना दोन प्रभागांतून निवडणूक लढविण्याच्या निर्णयाची किंमत मोजावी लागली. शिवसेनेचे नाना भानगिरे यांनी ६७ मतांनी निसटता विजय मिळविला. या प्रभागात ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान न होता ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याचे निकालावरून लक्षात येते. 

या प्रभागाचे क्षेत्रफळ सुमारे १४ किलोमीटरचे असल्याने कोंढव्याच्या पूर्व भागापासून काळेपडळपर्यंत प्रचार करताना उमेदवारांची मोठी दमछाक झाली. उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्यांपासून झोपडपट्टी परिसर, अशी मिश्र वस्ती आणि सर्व जाती-धर्मांचे नागरिक या भागात राहतात. त्यामुळे निवडणूक लढविताना उमेदवारांचा चांगलाच कस लागला. प्रभागातील ‘अ’ अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित गटातून शिवसेनेच्या प्राची आल्हाट या विजयी झाल्या. भाजपच्या अश्‍विनी सूर्यवंशी आणि ‘राष्ट्रवादी’च्या अस्मिता साळवे यांनी चांगली लढत दिली. मात्र शिवसेनेच्या पॅनेलच्या उमेदवारांनी एकत्रित केलेला प्रचार आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी न झाल्याचा फायदा आल्हाट यांना मिळाला.

नागरिकांच्या मागास प्रवर्ग असलेल्या ‘ब’ गटातून शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे आणि भाजपचे जीवन जाधव यांच्यात अटीतटीची लढत झाली. भानगिरे केवळ ६७ मतांनी विजयी झाले.

‘राष्ट्रवादी’चे फारुख इनामदार यांनी या भागात ५५ कोटी रुपयांची विकासकामे केली. सोसायट्यांमध्ये बोअरवेल, डीपी रस्ता, उद्यानांसह विविध विकासकामे करूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या वेळी त्यांनी प्रभाग क्रमांक २४ मधूनही बंडखोर अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. एकाचवेळी दोन प्रभागांतून निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचा त्यांना फटका बसला.

सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या ‘क’ गटातून ‘राष्ट्रवादी’च्या नंदा लोणकर यांनी बाजी मारली. त्यांच्या पूर्वीच्या प्रभागातील एनआयबीएम परिसर वगळता बहुतांश भाग नवीन प्रभागात जोडला गेला. लोणकर यांनी खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून विकासकामे केली; तसेच जनसंपर्क आणि त्यांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर भर दिला. त्यांना या विकासकामांचा निवडणुकीत फायदा झाला. भाजपच्या स्वाती कुरणे-भानगिरे आणि शिवसेनेच्या वैष्णवी घुले यांनी चांगली लढत दिली.

सर्वसाधारण ‘ड’ गटातून सर्वाधिक ११ उमेदवारांनी निवडणूक लढविली. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून घुले या एकाच आडनावाचे तीन उमेदवार होते. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे सुरवातीला वाटत होते; परंतु भाजपचे संजय (तात्या) गुलाब घुले, शिवसेनेचे तानाजी लोणकर आणि ‘राष्ट्रवादी’चे संजय (दादा) बबन घुले यांच्यात लढत झाली. मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर शेवटच्या टप्प्यात संजय (तात्या) घुले यांनी आघाडी घेत विजय मिळविला.