अनेक प्रभागांत ‘क्रॉस व्होटिंग’

अनेक प्रभागांत ‘क्रॉस व्होटिंग’

संपर्क, समाजगट आणि नातेसंबंधांमुळे पक्षभेद विसरून मतदान

पुणे - ‘दोन घड्याळ, दोन कमळ’, ‘कमळ अन्‌ पंजा जोडीनं चालला’, ‘नारळ, शिट्टी अन्‌ पंजा’, ‘तीन कमळ, एक करवत’ असे निरोप देत महापालिका निवडणुकीत शहरातील अनेक प्रभागांत ‘क्रॉस व्होटिंग’ झाले. आयाराम-गयाराम, वैयक्तिक संपर्क, समाजगट, नातेसंबंध आदींचाही परिणाम पक्षभेद विसरून मतदानावर झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

शहरात ४१ पैकी अगदी मोजक्‍याच प्रभागांत एकाच पक्षाचे चारही उमेदवार विजयी होतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या प्रभागांतही एखादे ‘सीट’ विरोधी पक्षाकडे जाऊ शकते. या निवडणुकीत भाजपमध्ये अन्य पक्षांतून मोठ्या संख्येने इच्छुक आले. त्यामुळे अनेक ठिकाणी विरोधी पक्षांतून आलेल्या उमेदवारांबरोबरच त्यांच्या पूर्वीच्या सहकाऱ्यांनाही मतदारांनी मतदान केल्याची चर्चा आहे; तसेच कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे, यापेक्षा काही वेळा उमेदवारांचा वैयक्तिक संपर्कही मतदान करताना महत्त्वाचा ठरतो, हेही पुन्हा अधोरेखित झाले. काही प्रभागांत उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांशी तडजोडी केल्या. त्यामुळे मतांमध्ये फाटाफूट झाल्याने एकाच पक्षाच्या चारही उमेदवारांचा प्रचार अखेरपर्यंत टिकला, असे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. 

एकाच पक्षाच्या तीन चिन्ह्यांचे बटण दाबल्यावर मतदार चौथ्या चिन्हालाही त्याचप्रमाणे मतदान करेल, असाही युक्तिवाद करण्यात येत आहे. काही ठिकाणी पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक समीकरणे महत्त्वाची ठरल्याचेही दिसून आले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या अनेक उमेदवारांबाबत क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे. त्यातच प्रभागाचा आकार मोठा व मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे मराठा, ब्राह्मण, जैन, मुस्लिम, दलित आदी समाजघटकही काही ठिकाणी प्रभावशाली ठरले.

‘आपला उमेदवार’- ‘त्यांचा उमेदवार’ अशीही थोडीफार विभागणी झाली. त्याचाही परिणाम क्रॉस व्होटिंगवर झाला. प्रमुख पक्षांच्या चारही उमेदवारांचे मनोमिलन शेवटपर्यंत झालेच नाही, असेही काही किस्से ऐकायला मिळत आहेत. मतदानादरम्यान उमेदवारांनी क्रॉस व्होटिंगसाठी केलेल्या चिठ्ठ्या विश्‍वासू कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या गटांपर्यंत पोचविण्यात आल्याचेही काही ठिकाणी दिसून आले. 

या प्रभागांत क्रॉस व्होटिंग झाल्याचा अंदाज 
येरवडा (प्रभाग ६), औंध-बोपोडी (प्रभाग क्र. ८), बाणेर-बालेवाडी-पाषाण (प्रभाग ९), रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर (प्रभाग ११), मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी (प्रभाग १२), शनिवार पेठ-सदाशिव पेठ (प्रभाग १५), कसबा पेठ-सोमवार पेठ (प्रभाग १६), लोहियानगर-कासेवाडी (प्रभाग १९), कोरेगाव पार्क-घोरपडी (प्रभाग २१), सॅलिसबरी पार्क-महर्षीनगर (प्रभाग २८), जनता वसाहत-दत्तवाडी (प्रभाग ३०), वडगाव धायरी- वडगाव बुद्रुक (प्रभाग ३३), सहकारनगर-पद्मावती (प्रभाग ३५), आंबेगाव दत्तनगर-कात्रज गावठाण (प्रभाग ४०), कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी (प्रभाग ४१).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com