#PuneTheater पुण्याला हवे सांस्कृतिक धोरण!

#PuneTheater पुण्याला हवे सांस्कृतिक धोरण!

पुणे - राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नाट्यगृहांची स्थिती अत्यंत वाईट आहे. नाट्यगृहांची देखभालदुरुस्ती ते नाट्य, कला आणि संस्कृती जोपासली जावी, यासाठी कोणत्याही पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी "सकाळ'च्या पुढाकाराने शहरासाठीचे सांस्कृतिक धोरण निश्‍चित करावे, अशी मागणी कलाकार, निर्माते, संयोजक आणि नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी एकमुखाने केली. 

कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात उभारण्यात आलेल्या नाट्यगृहांची सध्या दुरवस्था झाली आहे. या संदर्भात "चौथी घंटा अडचणींची' ही मालिका "सकाळ'कडून प्रसिद्ध होत आहे. यासंदर्भात कोणत्या उपाययोजना करता येतील आणि पुण्यातील सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, यासाठी काय पावले उचलता येतील, याबाबत अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली "सकाळ' कार्यालयात आज बैठक झाली. बैठकीला सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले सुनील महाजन, मोहन कुलकर्णी, प्रकाश भोंडे, निकिता मोघे, सुरेश देशमुख, अशोककुमार सराफ, शिरीष कुलकर्णी, समीर हंपी, प्रवीण सराफ, शशिकांत कोठावळे, वंदन नगरकर, वर्षा जोगळेकर, प्रवीण बर्वे, अरुण पटवर्धन, संतोष चोरडिया, भैरवनाथ शेरखाने, दीपक पवार, हनुमंत मते उपस्थित होते. या वेळी "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांनी या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी "सकाळ'च्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. 

नाट्यगृहे अनेकदा रिकामी पडून असतात. त्यामुळे नवोदित कलाकारांना तालमीसाठी सांस्कृतिक भवनातील एखादे सभागृह महापालिकेने उपलब्ध करून द्यावे. दर आठवड्याला नाट्यगृहांमध्ये कार्यक्रम झाल्यास कलाकारांनासुद्धा त्यांची कला सादर करण्यास चालना मिळेल आणि कलेला पोषक वातावरण निर्माण होईल. 
- कीर्ती शिलेदार, नियोजित अध्यक्षा, 98 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 

पालकमंत्री व सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांसमवेत नाट्यगृहांबाबत यापूर्वीही चर्चा झाली. त्यातून आजपर्यंत काही निष्पन्न झाले नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अकादमी स्थापन केली. कलाकारांना रंगमंच उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने प्रथम सांस्कृतिक धोरण निश्‍चित करावे. 
- सुनील महाजन, अध्यक्ष, कोथरूड नाट्य परिषद 

महापालिकेकडे 18 हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी काही कलेचे उपासकही आहेत. त्यांना नाट्य परिषद प्रशिक्षण देण्यास तयार आहे. त्यामुळे नाट्यगृहातील अंतर्गत कामेही मार्गी लागतील. 
- सुरेश देशमुख, अध्यक्ष, नाट्य परिषद, पुणे शाखा 

पुणे शहराला पुण्यनगरीप्रमाणेच कलानगरीही म्हटले जाते. शहराच्या उपनगरांमध्ये वेगवेगळ्या राज्यांतले, जिल्ह्यांतले नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. प्रत्येकाची अभिरुची निरनिराळी असते. म्हणूनच उपनगरांतील सांस्कृतिक भवनामध्ये त्यांना कलेची अभिरुची व्यक्त करण्यासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे. म्हणूनच कला-संस्कृतीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. 
डॉ. गणेश देवी, भाषा संशोधक 

बैठकीतल्या प्रमुख सूचना व मागण्या 
- शहराचे सांस्कृतिक धोरण निश्‍चित करावे 
- सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्थानिक नगरसेवकांनी सहकार्य करावे 
- सवलतीच्या दराने तिकीट विक्री व्हावी 
- नाट्यगृह अस्वच्छ केल्यास नाट्यनिर्माते, संयोजकांकडून दंड वसूल करावा 
- नाट्यगृहांमध्ये स्वच्छतागृहांची उत्तम व्यवस्था असावी 
- दर तीन महिन्यांनी नाट्यगृहाबाबतच्या देखभालीचा अहवाल महापालिकेने जाहीर करावा 
- नाट्यगृहांनी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवसांचे वेळापत्रक जाहीर करावे 
- "सकाळ सांस्कृतिक कलामंच' स्थापून कलाकार, नाट्यनिर्माते, संयोजकांच्या व्यथांना वाचा फोडावी 
- उपनगरांतील नाट्यगृहांचा अधिकाधिक वापर व्हावा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com