....पुन्हा सायकलींचं पुणं

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

आराखडा अंमलबजावणी अंतिम टप्प्यात; स्टॅंडसाठी 390 ठिकाणे निश्‍चित, 4700 सायकली उपलब्ध होणार

आराखडा अंमलबजावणी अंतिम टप्प्यात; स्टॅंडसाठी 390 ठिकाणे निश्‍चित, 4700 सायकली उपलब्ध होणार
पुणे - महापालिकेचा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला महत्त्वाकांक्षी सायकल आराखडा (बायसिकल प्लॅन) आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात पोचला आहे. सायकल स्टॅंडसाठी शहरातील 390 ठिकाणे दोन दिवसांपूर्वी निश्‍चित झाली आहेत. या ठिकाणांवरून 4700 सायकली पुणेकरांना उपलब्ध होणार आहेत. लवकरात लवकर म्हणजे दोन-तीन महिन्यांत या सार्वजनिक ठिकाणांवरून पुणेकरांना सायकली भाडेतत्त्वावर मिळणार आहेत.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या सायकल आराखड्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून महापालिकेत गेली अनेक वर्षे चर्चा सुरू होती. स्वयंसेवी संस्थाही त्यासाठी आग्रही होत्या. या पार्श्‍वभूमीवर तज्ज्ञ सल्लागारांनी तयार केलेला सायकल आराखडा महापालिकेकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला आहे.

- दर्जेदार सायकल ट्रॅकचे आव्हान
भाडेतत्त्वावरील सायकलींची योजना होत असली, तरी दर्जेदार सायकल ट्रॅकचे आव्हान उभे आहे. सध्याच्या ट्रॅकची अवस्था भीषण आहे, तसेच त्यांचे जाळेही कमी आहे. सायकल आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका पथ विभागाच्या अधिकाऱ्यांचीही दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात सायकल मार्गांचे जाळे विस्तारण्याबाबत चर्चा झाली. उपलब्ध सायकल ट्रॅकची सुरक्षितता जोपासताना आणखी काय उपाययोजना करता येतील, याबाबत त्यात सविस्तर चर्चा झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

- 16 कंपन्यांचा प्रतिसाद
शहरात सायकल आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठा प्रतिसाद दिला. तब्बल 16 कंपन्यांनी पुण्यात सायकल आराखड्याची अंमलबजावणी करण्यात स्वारस्य दाखविले. महापालिकेने त्यातील 9 संस्थांची निवड केली आहे. सायकल आराखड्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल, याबाबत आता अंतिम निश्‍चिती केली जाईल. त्यानंतर संबंधित कंपन्यांकडून महापालिकेला कोटेशन सादर केले जाईल. त्यातून एक किंवा त्यापेक्षा अधिक कंपन्यांची निवड होणार असल्याचे महापालिका सूत्रांनी नमूद केले.

- अशी होणार अंमलबजावणी
शहरांतर्गत वाहतुकीसाठी प्रामुख्याने सायकलींचा वापर होणार आहे. उदा. चंदननगरमधील प्रवासी पुणे स्टेशनपर्यंत पीएमपीच्या बसने उतरेल. तेथून त्याला महापालिकेत यायचे असल्यास पुणे स्टेशनजवळ तो सायकल भाडेतत्त्वावर घेईल. तेथून महापालिकेजवळ आल्यावर तेथील स्टॅंडवर तो सायकल जमा करेल. चंदननगरला पुन्हा परतण्यासाठी तो याच पद्धतीने सायकलचा वापर करेल. यामध्ये काही स्टॅंडवर सायकलींची संख्या वाढेल; परंतु संपूर्ण व्यवस्था संगणकीकृत असल्यामुळे एखाद्या स्टॅंडवर जमा होणाऱ्या जादा सायकली नजीकच्या दुसऱ्या स्टॅंडवर पोचविण्याची व्यवस्था संबंधित कंत्राटदाराने करायची आहे.

- सायकल वाहतूक वाढणार
वाहतुकीसाठी शहरात सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाण सध्या अवघे आठ टक्के आहे. आता 390 ठिकाणी सायकली उपलब्ध होणार असल्यामुळे हे प्रमाण निश्‍चितच वाढेल, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. दोन-तीन, दोन-पाच किलोमीटरच्या अंतरासाठी सायकली वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. या सायकलींचे भाडे काय असेल, याबाबत महापालिका आयुक्त, तसेच अन्य घटकांशी चर्चा करून निश्‍चित करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.

- जाहिरातींच्या अधिकारातून उत्पन्न
सायकल स्टॅंड, तसेच सायकलींवर जाहिरात करण्यासाठी संधी असेल. त्याचे अधिकार महापालिकेला असेल. त्यामुळे निविदांच्या माध्यमातून या जाहिरातींद्वारे महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्या उत्पन्नाचा विनियोग सायकल आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होऊ शकेल, असेही सांगण्यात आले.

- संगणकीकृत व्यवस्था
या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी 390 सायकल स्टॅंडवर एकात्मिक संगणकीकृत व्यवस्था असेल. प्रत्येक सायकल किती वेळा, किती वेळ वापरली गेली, तिची स्थिती याबाबतची नोंद विशेष संगणक प्रणालीमध्ये असेल. तेथे एकावेळी किती सायकली रस्त्यावर आहेत, याचीही माहिती एका क्‍लिकवर मध्यवर्ती केंद्रात मिळणार आहे.

Web Title: cycle in pune