माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

पुणे - समाजशास्त्रातील लेखन, संशोधन व अध्यापन कार्यात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ प्राध्यापक-संशोधक, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे (वय 81) यांचे मंगळवारी येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. 8) वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

पुणे - समाजशास्त्रातील लेखन, संशोधन व अध्यापन कार्यात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ प्राध्यापक-संशोधक, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे (वय 81) यांचे मंगळवारी येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. 8) वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

तत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र अशा दोन्हींच्या ऐतिहासिक संदर्भातून भारतात समाजशास्त्रीय विद्याशाखेची रचना झाली आणि त्यात मूलभूत संशोधन करणाऱ्यांपैकी डॉ. धनागरे हे एक. वाशीम हे त्यांचे मूळ गाव. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे नागपूर विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्र विषयाची पदवी व पदव्युत्तर पदवी घेतली होती. "नागरी व सार्वजनिक व्यवस्थापन' या विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याने त्यांना विद्यापीठाचे "एन. एन. वझरवार सुवर्णपदक' मिळाले होते. "भारतीय शेतकरी चळवळ' या विषयावरील प्रबंध इंग्लंडमधील विद्यापीठात सादर केला. याबद्दल तेथील विद्यापीठाने त्यांना "डॉक्‍टरेट' प्रदान केली होती. 

आग्रा विद्यापीठात संशोधनाची जबाबदारी सांभाळल्यानंतर पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात ते 1977 मध्ये रुजू झाले. येथे समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळतानाच 1995 मध्ये त्यांची कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली. डॉ. धनागरे हे या विद्यापीठाचे आठवे कुलगुरू होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी आपल्या विषयांत संशोधनपर लेख व पुस्तके या माध्यमातून विपुल लेखन केले. भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठांबरोबरच त्यांनी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, रशिया, स्वीडन, फ्रान्स, जपान अशा विविध देशांतील विद्यार्थ्यांनी शिकवले. एशियाटिक सोसायटीचे ते मानद फेलो होते. सिमल्याच्या "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज'ची अभ्यासवृत्तीही त्यांना मिळाली होती. 

"पॉप्युलिझम अँड पॉवर' हा त्यांचा ग्रंथ अलीकडेच प्रसिद्ध झाला. याच विषयावरील त्यांचा 1983 मध्ये प्रसिद्ध झालेला "पीझन्ट्‌स मूव्हमेंट इन इंडिया' हा ग्रंथही नावाजला गेला होता. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले होते. लेखन, वाचन, व्याख्याने यात ते गुंतले होते. वेगवेगळ्या धर्मसंप्रदायाचा, ज्ञातिसमाजांचा, गावगाड्याचा आणि राजकारणाने ग्रासलेल्या समाजकारणाचा त्यांनी बारकाव्याने अभ्यास केला होता. समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदाची धुराही तितकीच समर्थपणे सांभाळली होती. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच "कर्तव्यदक्ष समाजशास्त्रज्ञ हरपला', अशा शब्दांत त्यांना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या मागे दोन मुलगे आहेत. 

Web Title: D Na Dhangare dead