धरणे तुडुंब

Dimbhe-Dam-Veer-Dam
Dimbhe-Dam-Veer-Dam

डिंभ्याचे दरवाजे उघडले
घोडेगाव - आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यांसह नगर व सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारे डिंभे धरण गुरुवारी (ता. १६) सकाळी १० वाजता ९६.६१ टक्के भरले. धरणात १२.०७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० वाजता धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. दुपारी दोन वाजता धरणाच्या पाचही दरवाजांतून १३ हजार ६०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठाच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

डिंभे धरणाची एकूण साठवणक्षमता १३.५० टीएमसी आहे. उपयुक्त साठा १२.५० टीएमसी आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत धरणात ११.८४ टीएमसी पाणीसाठा होता. गेली पंधरा दिवसापासून डाव्या कालव्यातून ५५० क्‍युसेकने तर उजव्या कालव्यातून २०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी सकाळी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरण क्षेत्रात सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ७२७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. भीमाशंकर, आहुपे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. बुब्रा व घोडनदी दुथडी भरून वाहत आहे.

वीरमधून नीरेत विसर्ग
परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणातून गुरुवारी सकाळी दहाला नीरा नदीत तेरा हजार क्‍युसेक पाणी सोडण्यास सुरवात झाली. उपअभियंता अजित जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या चोवीस तासांत जास्तीचे पाणी नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असल्याचे शाखा अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले. या वेळी अभियांत्रिकी सहायक अभियंता संजय भोसले उपस्थित होते.

मंगळवारी संध्याकाळी सातला वीर धरण शंभर टक्के भरले. नीरा व वेळवंडी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, नीरा देवघर धरणातून ५११३ क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. भाटघर धरणातून २३२९ क्‍युसेक विसर्ग होत आहे. गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी नीरेत येत आहे. पुरंदर किल्ल्याच्या खोऱ्यातून कर्पुरा व रुद्रगंगा नद्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. वीर धरणात १७ हजार क्‍युसेकने पाणी येत असून, १३ हजार क्‍युसेक पाणी नीरा पात्रात सोडण्यात येत आहे.

वीर धरणाचे तीन वक्राकार दरवाजे चार फुटांनी वर उचलण्यात आले आहेत. उजव्या कालव्यातून १५५० क्‍युसेक व डाव्या कालव्यातून ८२७ क्‍युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरणात येणाऱ्या पाण्यात आणखी वाढ झाल्यास येत्या चोवीस तासांत धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होणार असल्याने खंडाळा, फलटण, इंदापूर, बारामती, माळशिरस, पंढरपूर तसेच पुरंदरमधील काही गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com