#MonsoonTourism भीमाशंकर - रेलिंग नसल्याने परिसरात धोका

aahupe_kada.jpg
aahupe_kada.jpg

आंबेगाव तालुक्‍यात मागील काही वर्षांत पश्‍चिम भागात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला अभयारण्य व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे पहिल्यापासून पर्यटक व भाविकांचा ओढा आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल आहे. पोखरी घाटात डिंभे धरण पाहण्यासाठी पिकनिक पॉइंट तयार झाला आहे. पावसाळ्यात या भागात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. 

मंचरपासून भीमाशंकर व आहुपे हे ६० किलोमीटर आहे. भीमाशंकरजवळील कोकणकडा व नागफणी ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. पण, धोकादायक आहेत. येथे पर्यटक टोकाला जाऊन सेल्फी घेतात. यात अनेक वेळा अपघात झाले आहेत. हा भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. येथे कोणताही सूचना फलक नाही. येथे रेलिंग नाही की सुरक्षारक्षक नाही. गाइड नसल्याने रस्ता चुकण्याचीही जास्त शक्‍यता आहे. 

कोंढवळ येथे प्रसिद्ध धबधबा आहे. हा धबधबा पाहावा यासाठी वनविभागाने जाहिरातही केली आहे. येथे झुलता पूल वनविभागाने बांधला आहे. दोन वर्षांपूर्वी येथे एक युवक झुलत्या पुलावरून पडून मृत्यू पावला होता. अडथळा म्हणून लोखंडी कठडे लावले असले, तरी हौसी युवक हे ओलांडून फोटो काढतात. 

पोखरी घाटातून डिंभे धरण पाहण्यासाठी पर्यटक रस्त्यावर गाड्या लावून थांबतात. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात. येथे पिकनिक पॉइंट तयार झाला आहे. परंतु, लोखंडी रेलिंग नसल्याने छोटे-मोठे अपघात होत असतात. तसेच, मंचर ते डिंभे गावापर्यंत रस्त्याच्या समांतर घोड नदी वाहते. येथे अंघोळीसाठी भाविक व पर्यटक थांबतात. स्थानिक गोष्टींचा अंदाज नसल्याने येथेही अपघात झाले आहेत. या सर्व ठिकाणी सूचना फलक लावावेत. पावसाळ्यात पोलिसांच्या गस्त वाढविल्यास यावर नियंत्रण येऊ शकते.

सुरक्षिततेबाबत सुविधा उपलब्ध करा
आंबेगाव तालुक्‍यात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, प्रशासनाकडून येथे कोणतीही सुविधा व संरक्षणात्मक बाबी आढळून येत नाही. विशेषतः आहुपे व भीमाशंकर खोऱ्यात पर्यटकांना अनेक घटनांना सामोरे जावे लागते. येथे पाहणी करून सोयी सुविधा उपलब्ध करण्याची पर्यटकांची मागणी आहे. कोकणकडा व नागफणी येथे लोखंडी रेलिंग आवश्‍यक आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल परिसरात सुरक्षारक्षक असणे आवश्‍यक आहे. पोखरी घाटातील पिकनिक पॉइंट परिसरात लोखंडी रेलिंग असावेत. ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. 

पावसाळ्यात निसर्गाची स्थिती बदलत राहती. निसर्गाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. पर्यटन, ट्रेकिंग करताना स्थानिकांच्या सूचनांचे पालन करावे. 
- गौतम वैष्णव व निनाद बारटक्‍के, पर्यटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com