daund
daund

दौंड - स्टेट बॅंकेवर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा

दौंड( पुणे) : दौंड शहरातील स्टेट बॅंक आॅफ इंडिया शाखेतील कर्मचार्यांकडून सेवानिवृत्तीवेतन धारकांना एटीएम कार्डद्वारे सेवानिवृत्तीवेतनाची रक्कम काढण्याच्या सक्तीच्या विरोधात आणि बॅंकेकडून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ बॅंकेवर मोर्चा काढण्यात आला होता. महिला सेवानिवृत्तीधारकांवर ओरडणारे आणि त्यांचा अपमान करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

दौंड रेल्वे पेन्शनर्स असोसिएशन यांच्या वतीने आज (ता. ६) स्टेट बॅंकेच्या शाखेवर मोर्चा काढण्यात आला होता. असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल वाघाडे, सचिव ना. द. कावळे, खजिनदार एस. एल. भालेराव, एस. आर. काळे, एच. जी. मोरगावकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष ए. एफ. दुराईस्वामी, सचिव जी. के. गाडिलकर, माजी नगराध्यक्ष विवेकानंद संसारे यांच्यासह एम. जी. शुक्ला,  आदी या वेळी उपस्थित होते. 

स्टेट बॅंक शाखेकडून सेवानिवृत्तीवेतनाची रक्कम एटीएम कार्डद्वारे काढण्याची सक्ती रद्द करणे, सेवानिवृत्तीवेतन मिळण्यास होणारा विलंब प्रकरणी कारवाई करणे, मयत सेवानिवृत्तीवेतन धारकांच्या नातलगांना सेवानिवृत्तीवेतन मिळण्यास होणारा विलंब थांबविणे, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी न घेणार्यांवर कारवाई करणे, तीन महिन्यापेक्षा अधिक काळ सेवानिवृत्तीवेतन न मिळाल्यास बॅंकेकडून आवश्यक कायर्वाही करणे, ८० व ८० पेक्षा अधिक वय असणार्या सेवानिवृत्तीवेतन धारकांना देय लाभ त्वरित देणे, आदी मागण्या दौंड रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने ना. द. कावळे यांनी एका निवेदनाद्वारे केल्या. 

रेल्वे पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने महिलांशी असभ्य वागणार्या कर्मचार्यांविरूध्द कारवाई करणे, मृत्यू प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतरही ५ ते ६ महिने पेन्शन मिळत नसल्याने त्या बाबत सत्वर कार्यवाही करणे, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सेवानिवृत्तीवेतन मोबाईल कारद्वारे सेवानिवृत्तीवेतन धारकांच्या घरी जाऊन देण्याचे निर्देश दिल्याने त्या संदर्भात सेवा सुरू करणे, आदी  मागण्या अध्यक्ष ए. एफ. दुराईस्वामी यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

शाखाधिकारी यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रगीत गायनाने मोर्चाची सांगता करण्यात आली. 

बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी यांचे कर्मचार्यांवर नियंत्रण नसल्याने स्टेट बॅंकेच्या या शाखेतील कारभाराविषयी तक्रारींचे प्रमाण वाढलेले आहे. 

बॅंक कर्मचारी सिगारेट फुकण्यासाठी सतत बाहेर.....
सेवानिवृत्तीवेतन विभाग सांभाळणारा एक कर्मचारी हा सिगारेट फुकण्यासाठी सतत शाखेबाहेर जात असल्याने सेवानिवृत्तीवेतन धारकांना ताटकळत थांबावे लागत आहे. पुरेशी माहिती न देणे, तक्रारींची पोच न देणे आणि महिलांशी उध्दटपणे बोलणार्या या कर्मचार्यामुळे पेन्शनर्स त्रस्त आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी या बाबत तक्रार करूनही वरिष्ठ अधिकारी सोईस्कररित्या मौन बाळगून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com