दिवस राजकीय खेळी-प्रतिखेळींचा 

दिवस राजकीय खेळी-प्रतिखेळींचा 

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या आणि डावाला प्रतिडावाने उत्तर देण्याच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे दर्शन प्रमुख पक्षांनी आज घडविले.

त्यामुळे आघाडीचा निर्णय होऊनही तो जाहीर करण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने टाळले. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपने निश्‍चित केलेल्या उमेदवारांच्या यादीत अखेरपर्यंत बदल करण्याची प्रतिखेळी रचली. दुसरीकडे शिवसेना आणि मनसेनेही शुक्रवारीच थेट उमेदवारीचे पत्र निश्‍चित केलेल्या इच्छुकांच्या हाती ठेवण्याचे ठरविले. या राजकारणाच्या खेळी-प्रतिखेळींची चर्चा दिवसभर सुरू होती. 

शहरातील 41 प्रभागांतील 162 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची, तसेच उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरूच होती. तसेच आघाडी होणार की नाही, याचा घोळ कायम होता; मात्र आज त्याला जबरदस्त वेग आला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी होणार, हे निश्‍चित झाले; मात्र बंडखोरीला आळा बसावा आणि मुख्य प्रतिस्पर्धी भाजपला उमेदवार निश्‍चितीचा सुगावा लागू नये, यासाठी आघाडीचा निर्णय अधिकृतरीत्या जाहीरच करण्यात आला नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्यांना निश्‍चित उमेदवारी द्यायचीच आहे, अशांना वैयक्तिकरीत्या संपर्क साधत अर्ज दाखल करण्यास सांगितले. 

आपल्या उमेदवारांची निश्‍चिती करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते विश्‍वजित कदम आणि शहराध्यक्ष रमेश बागवे चक्क हेलिकॉप्टरने मुंबईला पक्षश्रेष्ठींकडे रवाना झाले. 
दरम्यान, भाजपच्या गोटात वेगळ्याच घडामोडी सुरू झाल्या. खासदार-आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी लावून धरलेल्या आपापल्या समर्थकांच्या नावांच्या घोळात त्या पक्षाच्या उमेदवारांची यादी अडकून पडली होती. ती अंतिम होत असतानाच राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांच्या आघाडीची बातमी त्यांच्यापर्यंत येऊन थडकली. त्यामुळे पुन्हा या पक्षाचे नेते पुन्हा यादी घेऊन बसले आणि आघाडीला तोंड देण्यासाठी पुन्हा उमेदवार बदलायचे का, याबाबतचा खल सुरू केला. 

शिवसेना आणि मनसेलाही या घडामोडींचा पत्ता लागला आणि त्यामुळे या पक्षांची यादीही आज जाहीर होऊ शकली नाही. शिवसेनेने काही निवडक जणांना अर्ज दाखल करण्यास वैयक्तिकरीत्या सांगितले. रिपब्लिकन पक्षाचीही भाजपशी जागावाटपाबाबतची चर्चा मुंबईत सुरू असल्याने त्या पक्षाचीही यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर होऊ शकली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com