ओढ्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

पुणे : आंबिल ओढ्यात ड्रेनेजच्या खड्ड्यातून वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह आज (रविवारी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कसबा पंपिंग स्टेशनजवळ सापडला. क्रिकेट खेळताना चेंडू काढण्यासाठी गेला तेव्हा तो ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला होता.

पुणे : आंबिल ओढ्यात ड्रेनेजच्या खड्ड्यातून वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह आज (रविवारी) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कसबा पंपिंग स्टेशनजवळ सापडला. क्रिकेट खेळताना चेंडू काढण्यासाठी गेला तेव्हा तो ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला होता.

गणेश किशोर चांदणे (वय 14) हा ड्रेनेजच्या खालच्या बाजूस पडलेल्या खड्ड्यातून वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली होती. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. त्याचा मृतदेह आज ड्रेनेजमधून वाहत आला. कसबा पंपिंग स्टेशनजवळ त्याचा मृतदेह काही लोकांना दिसला. ही माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. त्यांनी गणेशचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. 

दांडेकर पूल परिसरात आंबिल ओढा येथे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. आंबिल ओढा ते दांडेकर पूल या दिशेने असणाऱ्या नाल्याचे साफसफाईचे काम सुरू होते. त्यासाठी नाल्याचे पाणी अडवून ड्रेनेजमध्ये सोडले होते. ड्रेनेजच्या चेंबरजवळ मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले होते. तेथून काही अंतरावर गणेश मित्रांसमवेत क्रिकेट खेळत होता. चेंडू पाण्यात पडल्यामुळे तो पाण्यात गेला; परंतु तोल जाऊन पाण्यात पडला. तेथे साचलेले पाणी ड्रेनेजमधून सोडले होते. पाण्याला वेग असल्यामुळे तो ड्रेनेजच्या खालच्या बाजूला पडलेल्या खड्ड्यात ओढला गेला. ते पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. नागरिकांनी हा प्रकार कळविल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले. त्यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी ड्रेनेजचे चेंबर उघडून मुलाचा शोध घेतला. या ड्रेनेजचे पाणी कसबा पंपिंग स्टेशनजवळ जाते. त्यामुळे तेथेही अग्निशामक दलाचे जवान थांबून होते.

अग्निशामक दलाच्या जवानांनी शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत त्याचा शोध घेतला; परंतु अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते.

फोटो गॅलरी