'खारदुंग ला' सर करणाऱ्या दुचाकीस्वाराचा पुलावरून कोसळून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

बाईक होती पॅशन 
कोणती बाईक घ्यावी, त्यातील गुण दोष, वैशिष्ठ्ये यांची उत्तम जाणकारी आशुतोष यांना होती. बाईक स्वारांना आव्हान देणारा 12380 फूट उंचीवर असलेला खारदुंगला टॉप आशुतोषने मित्रांसोबत बाईकवर सर केला होता. स्पोर्टी गाड्यांची त्यांना खूप आवड होती.

पुणे : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पौड फाटा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावरून दुचाकीसह खाली कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (सोमवार) पहाटे एकच्या सुमारास झाला. आशुतोष दत्ता फडके (वय 38, रा. विजय सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरूड) असे त्या युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, 'बाईक्‍स' ही आशुतोष यांची 'पॅशन' होती. समुद्रसपाटीपासून 12,380 फूट उंचीवर असलेला खारदुंगला टॉप आशुतोष यांनी मित्रांसह बाईकवर सर केला होता. 

कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार : आशुतोष हे पहाटे दुचाकीवरून कोथरूडच्या दिशेने येत असताना उड्डाणपुलावरून खाली पडले. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्‍टरांनी आशुतोष यांना मृत घोषित केले. कोथरूड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

आशुतोष हे 'फडके ऑटोमोबाईल्स'चे मालक होते. दुचाकी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण शास्त्रीनगरवर शोककळा पसरली. 

बाईक होती पॅशन 
कोणती बाईक घ्यावी, त्यातील गुण दोष, वैशिष्ठ्ये यांची उत्तम जाणकारी आशुतोष यांना होती. बाईक स्वारांना आव्हान देणारा 12380 फूट उंचीवर असलेला खारदुंगला टॉप आशुतोषने मित्रांसोबत बाईकवर सर केला होता. स्पोर्टी गाड्यांची त्यांना खूप आवड होती.

शेवटची पोस्ट 
'आज फेसबुकवर मातृदिनाच्या शुभेच्छांचा पाऊस पडतोय. माझ्यासकट अशा माझ्या निरागस मित्रांना जन्म देणाऱ्या माझ्या आणि त्यांच्या मातांना माझा साष्टांग नमस्कार...' काल मातृदिनानिमित्त आशुतोष यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट त्याच्या मित्र व नातेवाईकांच्या आसवांचा बांध रिता करणारी ठरली.