#StreetDogs रेबीजमुळे  महिलेचा मृत्यू

#StreetDogs रेबीजमुळे  महिलेचा मृत्यू

येरवडा - लक्ष्मीनगर येथील हिराबाई भोंडे (वय ६५, रा. मूळ गाव सासवड) या अनाथ महिलेचा रेबीजमुळे शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्यांच्यावर महापालिकेच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, येथील सहा ते आठ मुलांसह बारा ते पंधरा जणांना कुत्रा चावल्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

हिराबाई गेली दोन वर्षे रस्त्याच्याकडेला असलेल्या एका घराशेजारी आडोसा करून राहत होत्या. त्यांना शेजारी राहणारे जेवण देत होते. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी त्यांना पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक झाली होती. त्यामुळे शेजारी राहणारे अंजुम सय्यद, उमेश शेंडगे, फिरोज सय्यद, पप्पू पगारे, गणेश बंधारे यांनी हिराबाईंना नायडू रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजुम सय्यद म्हणाल्या, की हिराबाई लक्ष्मीनगर येथे एका लहान घरात एकट्या राहत होत्या. दोन वर्षांपूर्वी घरात आग लागल्यामुळे त्यांनी आपला संसार रस्त्याच्याकडेला मांडला होता.  त्यांना कुत्र्याने चावा घेतल्याचे कोणाला कळलेच नाही. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्या विचित्र आवाज काढत होत्या. त्यामुळे त्यांना तत्काळ नायडू रुग्णालयात दाखल केले. त्यांचा तेथे मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांचा पत्ता नाही. त्यांच्याकडे एसटी महामंडळाचे ओळखपत्र होते. तेथे त्या सफाईचे काम करीत असल्याचे समजते.   

भटक्‍या कुत्र्यांबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष
लक्ष्मीनगर येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने सहा ते सात मुलांसह पंधरा जणांना चावा घेतला आहे. त्यांनी राजीव गांधी रुग्णालयात अँटीरेबीजचे इंजेक्‍शन घेतले असून, परिसरात मोठ्या संख्येने भटकी कुत्री आहेत. त्यांना पकडण्याबाबत अनेक वेळा येरवडा क्षेत्रीय कार्यालय व नगरसेवकांना विनंती केली. मात्र, ते दुर्लक्ष करीत असल्याची टीका स्थानिक नागरिकांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com