डेक्कन जिमखाना ते कर्वे पुतळ्यापर्यंत कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पुणे - डेक्‍कन जिमखाना बस स्थानक ते अभिनव चौक (नळस्टॉप) आणि करिष्मा चौक ते कर्वे पुतळ्यापर्यंत दररोजच वाहतूक कोंडी. घरातून सकाळी कामावर जाताना आणि सायंकाळी घरी परतताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीमध्ये बराच वेळ अडकून पडावे लागत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पुणे - डेक्‍कन जिमखाना बस स्थानक ते अभिनव चौक (नळस्टॉप) आणि करिष्मा चौक ते कर्वे पुतळ्यापर्यंत दररोजच वाहतूक कोंडी. घरातून सकाळी कामावर जाताना आणि सायंकाळी घरी परतताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीमध्ये बराच वेळ अडकून पडावे लागत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कर्वे रस्त्यावरील करिष्मा चौक, तसेच करिष्मा चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर कॅनॉल रस्ता मिळतो. त्या चौकात वाहतूक कोंडी होते. कोथरूड सिटी प्राइडसमोरील रस्त्यावर अनधिकृत रिक्षा तळ आणि चुकीच्या पार्किंगच्या पट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी होते. कर्वे शिक्षण संस्थेजवळ अरुंद रस्ता असून, त्यालगत स्टॉल्स आहेत, तसेच वाहनचालकांकडून शिस्त पाळली जात नसल्याचे पाहणीत आढळून आले.

कर्वे पुतळा चौक आणि राहुल सोसायटीकडून येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत असून, या ठिकाणी वाहतूक नियोजन विभागाकडून सिग्नल बसविण्याची गरज आहे. कोथरूड येथील आझादनगर चौक, भुसारी कॉलनी आणि गुजरात कॉलनी रस्ता जंक्‍शन या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ही वाहतूक कोंडी दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभाग, क्षेत्रीय कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित प्रयत्न केल्यास ही समस्या सुटणार आहे.   

डेक्‍कन जिमखाना बस स्थानक चौक :
शिवाजीनगरकडून आणि भिडे पुलावरून येणारी वाहने या चौकात एकत्रित येतात. त्या वेळी डेक्‍कन जिमखाना बस स्थानकातून बसेसही बाहेर पडत असतात. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. डेक्‍कन जिमखाना बस स्थानकालगत रिक्षांसाठी वाहनतळ आहे, तरीही या चौकातील दुसऱ्या बाजूला नो पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी आणि अनधिकृत रिक्षा थांबतात, त्यामुळे या चौकात कोंडी होते.

उपाययोजना...
- नो पार्किंगच्या ठिकाणी थांबणारी वाहने हटविण्याची गरज
- वाहतूक पोलिस नेमणे आवश्‍यक.

अभिनव चौक (नळस्टॉप) :   
या चौकात वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. पदपथावर झालेले अतिक्रमण, रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे लावलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडी होते.

उपाययोजना.... 
- उड्डाण पूल बांधण्याची गरज 
- सिग्नलचे सुसूत्रीकरण आवश्‍यक