गणवेशाचे पैसे थेट बॅंक खात्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पुणे - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात गणवेश आणि शालेय साहित्याचे पैसे जमा करण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत एक लाख 17 हजार विद्यार्थी असून, त्यांना हव्या त्या दुकानातून ही खरेदी करता येणार आहे. 

पुणे - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात गणवेश आणि शालेय साहित्याचे पैसे जमा करण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत एक लाख 17 हजार विद्यार्थी असून, त्यांना हव्या त्या दुकानातून ही खरेदी करता येणार आहे. 

विद्यार्थ्यांचा गणवेश आणि शैक्षणिक साहित्याच्या खरेदीचा विषय दरवर्षी वादग्रस्त ठरतो. या वर्षी या प्रस्तावावर स्थायी समितीने उशिरा निर्णय घेतला. गेल्या वर्षीप्रमाणेच "डीबीटी' पद्धतीने विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न केला जात होता. केंद्र आणि राज्य सरकारने योजनांतील लाभार्थीच्या बॅंक खात्यात थेट पैसे जमा करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार निर्णय घेणे अपेक्षित होते. स्थायी समितीच्या गेल्या चार ते पाच बैठकांत डीबीटी आणि इतर पर्यांयाचा विचार केला जात होता. परंतु आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यातच पैसे जमा करण्याचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीने घेतला. 

गणवेशाचा रंग गेल्या वर्षीप्रमाणे कायम आहे. याकरिता सुमारे 16 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या निश्‍चित होईल. ज्या विद्यार्थ्यांचे बॅंक खाते नाही त्याच्या पालकांच्या बॅंक खात्यात ते जमा केले जातील. 12 ते 14 जून या कालावधीत रक्कम जमा केली जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

* प्राथमिक शाळेत 52 हजार विद्यार्थी असून, त्यापैकी 12 हजार विद्यार्थ्यांचे बॅंकेत खाते आहे. 
* महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील विद्यार्थ्यांची संख्या नंतर निश्‍चित केली जाईल 
* गणवेश, स्वेटर, बूट, रेनकोड, वह्या, पुस्तके आदींचा समावेश 

बॅंक खात्यात जमा होणारी रक्कम 
बालवाडी : 2 हजार 160 रुपये 
प्राथमिक (इयत्ता पहिली ते चौथी) : 2 हजार 410 ते 2 हजार 539 रुपये 
माध्यमिक (इयत्ता 5 वी ते 8 वी) : 3 हजार 36 ते 3 हजार 166 रुपये 

क्रीडा निकेतन 
प्राथमिक : 5 हजार 149 ते 5 हजार 203 रुपये 
माध्यमिक : 5 हजार 716 ते 5 हजार 912 रुपये 

विद्यानिकेतन 
प्राथमिक : 2 हजार 644 ते 2 हजार 686 रुपये 
माध्यमिक : 3 हजार 207 ते 3 हजार 297 रुपये 

Web Title: The decision to collect Uniform money in the bank account of the students of Municipal Schools