नोकऱ्या निर्माण करण्याचा निश्‍चय करा - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

वाघोली - मी नोकरी करणार नाही, तर नोकऱ्या निर्माण करेन, असा निश्‍चय मराठी तरुणांनी करावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. एका कंपनीच्या उद्‌घाटनाकरिता ठाकरे वाघोलीत आले होते. या वेळी ठाकरे बोलत होते. 

वाघोली - मी नोकरी करणार नाही, तर नोकऱ्या निर्माण करेन, असा निश्‍चय मराठी तरुणांनी करावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. एका कंपनीच्या उद्‌घाटनाकरिता ठाकरे वाघोलीत आले होते. या वेळी ठाकरे बोलत होते. 

ते म्हणाले, ""व्यवसाय करायला धाडस लागते. त्यातही बेकरीसारखा व्यवसाय करण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा करावी लागते. मराठी माणूस उद्योजक होत आहे. म्हणजे हे काळ बदलल्याचे उदाहरण आहे. अंधश्रद्धा झुगारून मराठी मुले पुढे जात आहेत, ही गौरवाची बाब आहे. प्रत्येकाने मी व्यवसाय करेन, असा निश्‍चय केल्यास मराठी उद्योजकांकडून नोकऱ्या निर्माण होतील. तुमचे उत्पादन असे तयार करा, की ग्राहकांनी ही वस्तू खाल्ली तर याच कंपनीची खाईल, असा निश्‍चय केला पाहिजे.'' 

या वेळी त्यांनी कंपनीने बनविलेल्या पहिल्या केक उत्पादनावर क्रिमने व्यंग्यचित्र रेखाटून उपस्थितांना त्यांच्यातील व्यंग्यचित्रकाराची झलक दाखवली. या प्रसंगी मनसेचे बाळा नांदगावकर, बाबाराजे जाधवराव, अविनाश अभ्यंकर, माजी आमदार विलास लांडे, हेमंत बत्ते, संदीप सातव, अविनाश सातव उपस्थित होते. 

विलास लांडे यांची उपस्थिती 

राष्ट्रवादीचे माजी आमदार व विधान परिषदेचे उमेदवार विलास लांडे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या शेजारीच ते व्यासपीठावर बसले होते. त्यांच्याशी चर्चाही सुरू होती. यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Web Title: The decision to create jobs - Raj Thackeray