नागरिकांच्या सूचना हाच आमचा जाहीरनामा

party-member-sakal
party-member-sakal

पुणे - शहराचा सुनियोजित आणि सूत्रबद्ध विकास होण्यासाठी, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि वाहतूक-घनकचरा-पाणीपुरवठा-आरोग्य-शिक्षण आदींबाबत पुणेकरांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर व्यक्त केलेल्या अपेक्षांचा समावेश आपापल्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये करण्याची ग्वाही सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी शुक्रवारी दिली. तसेच शहराचा विकास करण्यासाठीचे त्या व्यतिरिक्तचे बहुविध पर्यायही या प्रतिनिधींनी या वेळी मांडले. 

महापालिका निवडणुकीत मतदारांसमोर आपला पक्ष शहराचा विकास कशा पद्धतीने करणार, यासाठी सर्वच राजकीय पक्ष सध्या जाहीरनामा तयार करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहराचा विकास कसा व्हावा, यासाठी ‘सकाळ’ने नागरिकांकडून लेखी स्वरूपात सूचना मागविल्या होत्या. त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा, झोपडपट्टी पुनर्वसन, पर्यावरण, स्टार्टअप- कौशल्य विकास, उद्योग- व्यापार या क्षेत्रांतील सूचनांबरोबरच महिला- ज्येष्ठ नागरिक, युवतींनीही त्यांच्या मनातील शहर कसे असावे, या बाबतच्या अपेक्षा लेखी स्वरूपात मांडल्या. त्याचा तपशील ‘सकाळ’ने गेले आठ दिवस ‘जाहीरनामा पुणेकरांचा’ या सदरातून मांडला. नागरिकांच्या केलेल्या सूचनांचे संकलन करून ते आज प्रमुख राजकीय पक्षांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर या पक्षांच्या शहरांध्यक्षांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली आणि त्यांनी या विविध मुद्‌द्‌यांवर तपशीलवार चर्चा केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि खासदार ॲड. वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख हेमंत संभूस, अजय शिंदे, शिवसेनेचे शहर संघटक श्‍याम देशपांडे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शहराध्यक्ष महेंद्र कांबळे तसेच नवनाथ कांबळे, भारिप- बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष म. ना. कांबळे तसेच वैशाली चांदणे, आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी मुकुंद किर्दत आदी सहभागी झाले होते. ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी स्वागत केले तर, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांनी प्रास्ताविक केले. सहयोगी संपादक सुनील माळी यांनी सूत्रसंचालन केले.  

मुख्य समस्या वाहतुकीचीच

शहराला भेडसावणारी मुख्य समस्या ही वाहतूक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यास या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दुजोरा दिला. या मुद्‌द्‌यावरून प्रारंभ झालेल्या चर्चेत एकात्मिक वाहतूक यंत्रणेची शहराला गरज असून मेट्रो, मोनोरेल, रिंगरोड, बाह्यवर्तुळाकार द्रुतगती मार्ग तसेच अंतर्गत वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) आदींची शहराला आवश्‍यकता असल्याचा मुद्दा सर्वांनी मांडला. तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्याशिवाय खासगी वाहनांची संख्या कमी होणार नाही, प्रदूषण कमी होणार नाही, याचा पुनरुच्चार करण्यात आला तसेच पीएमपीच्या बसची संख्या वाढविण्याची गरज असल्याच्या मुद्‌द्‌यावर सर्वांचे एकमत झाले. बीआरटीबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता करून ही सेवा चांगल्या पद्धतीने लोकापर्यंत पोचविण्याची गरजही या वेळी व्यक्त झाली.

घराबरोबरच रोजगारही

झोपडपट्टीधारकांना ३५० नव्हे तर, ५०० चौरस फुटांचे घर देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वच प्रतिनिधींनी अनुकूलता दर्शविली. तर, झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन करताना त्यांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील, याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकताही या वेळी व्यक्त करण्यात आली. 

कचऱ्यासाठी नवे तंत्रज्ञान

घनकचरा व्यवस्थापनासाठी जगात यशस्वी ठरलेल्या तंत्रज्ञानाचा वापर प्रकल्पांत व्हावा. तसेच कचऱ्याचे ओला आणि सुका, असे वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज चर्चेत व्यक्त करण्यात आली. 

जलवाहिन्यांचे जाळे 

शहराला २४ तास समान आणि शुद्ध पाणी देण्यासाठी जलवाहिन्यांचे भूमिगत जाळे नव्याने विकसित करायला हवे आणि साठवणूक क्षमताही वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतरच्या टप्प्यात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटर पद्धतीचा अवलंब करायला हवा, यावरही उपस्थितांचे एकमत झाले. शहरातील मुळा- मुठा नदीचे संवर्धन करतानाच निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा, अशी अपेक्षा या चर्चेत व्यक्त झाली.

स्टार्ट अप आणि कौशल्य प्रशिक्षण

पर्यावरण, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम, स्टार्ट अप आणि कौशल्य प्रशिक्षणाबद्दलही समाजात जागरूकता निर्माण करून त्यानुसार धोरण ठरविण्यात येईल, असे उपस्थितांनी नमूद केले. 

सर्वच पक्षांसाठी उपयुक्त ठरला पुणेकरांचा जाहीरनामा 

शहराच्या हितासाठी सर्वच घटक कार्यरत असतात. नागरिकही त्यात सूचना करीत असतात. राजकीय पक्ष जाहीरनामा तयार करीत असताना नागरिकांशी संवाद साधला जातोच; परंतु ‘सकाळ’ने मांडलेल्या पुणेकरांच्या जाहीरनाम्याद्वारे राजकीय पक्षांना एक मैलाचा दगड गाठण्यात यश आल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केली. तर,  ‘ ‘सकाळ’च्या माध्यमातून मिळालेल्या नागरिकांच्या सूचना जाहीरनामा तयार करताना मोलाच्या ठरतील’, असे मत शिवसेना, मनसे, भाजप, रिपब्लिकन पक्ष, भारिप बहुजन महासंघाने व्यक्त केले. राष्ट्रवादीने ‘पुणे कनेक्‍ट’च्या माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे तीन हजार नागरिकांच्या सूचना जाहीरनाम्यासाठी गोळा केल्या आहेत. आता ‘ ‘‘सकाळ’च्या जाहीरनाम्याचाही समावेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात करू’, असे खासदार चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com