आठ तालुक्‍यांमध्ये मुलींच्या प्रमाणात घट 

योगिराज प्रभुणे
गुरुवार, 16 मार्च 2017

पुणे - विकसित आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 14 पैकी आठ तालुक्‍यांमध्ये सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर एकाने घसरल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. 

पुणे - विकसित आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 14 पैकी आठ तालुक्‍यांमध्ये सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर एकाने घसरल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. 

म्हैसाळ (जि. सांगली) येथील स्त्री भ्रूणहत्याकांडानंतर खडबडून जागा आलेल्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तुलनेत जन्माला आलेल्या मुलींच्या प्रमाणाचा सहामाही अहवाल 14 मार्चला प्रसिद्ध केला. पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांमध्ये मुलांच्या तुलनेत जन्माला येणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यातून पुढे आले. अवघ्या चार तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण किंचित वाढले असून, दोन तालुक्‍यांमध्ये हे प्रमाण स्थिर असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. 

प्रमाण 915 वरून 914 
पुणे जिल्ह्यात सहा वर्षांपर्यंत जन्मलेल्या प्रत्येकी एक हजार मुलांमागील मुलींचे प्रमाण 2014 मध्ये 915 होते. हे प्रमाण गेल्या दोन वर्षांपासून 914 पर्यंत कमी झाले आहे. 2014 मध्ये 53 लाख आठ हजार 712 मुलांच्या जन्माची नोंद आरोग्य खात्यात झाली आहे. त्याचवेळी मुलींचे प्रमाण 48 लाख 52 हजार 248 होते. मुलांच्या तुलनेत चार लाख 56 हजार 464 मुली कमी होत्या. 2016 मध्ये मुलांच्या तुलनेतील मुलींचे प्रमाण चार लाख 79 हजार 86 पर्यंत कमी झाल्याची नोंद अहवालात केली आहे. 

मुलींचा जन्म कमी झालेले तालुके 
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, भोर, जुन्नर, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली आण शिरूर या तालुक्‍यांमधील मुलांच्या तुलनेतील मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. 

लिंगगुणोत्तर स्थिर राहिलेले तालुके 
पुणे शहर आणि पुरंदर 

मुलींचे प्रमाण वाढलेले तालुके 
बारामती आणि दौंड 
दृष्टिक्षेपात लिंगगुणोत्तर (एक हजार मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण) 
तालुका ............. 2014 ......... 2016 
आंबेगाव ............ 979 ........... 976 
बारामती ............. 943 ........... 946 
भोर .................. 977 ........... 964 
दौंड .................. 939 ........... 847 
हवेली ................ 850 ........... 847 
इंदापूर ................ 927 ........... 927 
जुन्नर ................. 973 ................ 972 
खेड .................. 892 ................ 882 
मावळ ................ 902 ................ 902 
मुळशी ............... 899 ................. 893 
पुणे शहर ............ 943 .................. 952 
पुरंदर ................. 965 ................. 968 
शिरूर ................. 916 ................. 910 
वेल्हे ................ 982 .................. 971 
(स्रोत ः सार्वजनिक आरोग्य खाते, महाराष्ट्र राज्य) 

""बारा ते वीस आठवड्यांच्या दरम्यान गर्भपात करण्याचा अधिकार महिलांना आहे. त्यामुळे यादरम्यान होणारे गर्भपात कायदेशीर असतात. पुणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या गर्भवतींची प्रसूती काही वेळा दुसऱ्या जिल्ह्यात होते. त्यामुळे त्याची नोंद होत नाही. तसेच मृत अर्भकाचे प्रमाण विचारात घेऊन मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण का कमी होत आहे, याचा विचार केला जाईल. त्याला रोखण्यासाठी प्रभावी उपायही तातडीने केले जातील.'' 
- रुद्रप्पा शेळके, शल्यचिकित्सक, पुणे. 

Web Title: The decline in the proportion of girls in eight talukas