पराभूत समर्थक रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

ईव्हीएम मशिनमध्ये गडबड केल्याचा आरोप; बिबवेवाडीत तणाव
बिबवेवाडी - प्रभाग क्र. ३६ मार्केट यार्ड इंदिरानगर लोअरमधील मतदानाच्या ईव्हीएम मशिनमध्ये गडबड केल्यानेच भाजप पॅनेलमधील चारही उमेदवार निवडून आल्याचा आरोप करीत पराभूत उमेदवार व सर्मथक गुरुवारी निकालाच्या रात्री रस्त्यावर उतरले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

ईव्हीएम मशिनमध्ये गडबड केल्याचा आरोप; बिबवेवाडीत तणाव
बिबवेवाडी - प्रभाग क्र. ३६ मार्केट यार्ड इंदिरानगर लोअरमधील मतदानाच्या ईव्हीएम मशिनमध्ये गडबड केल्यानेच भाजप पॅनेलमधील चारही उमेदवार निवडून आल्याचा आरोप करीत पराभूत उमेदवार व सर्मथक गुरुवारी निकालाच्या रात्री रस्त्यावर उतरले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

प्रभागामध्ये भाजपचे सुनील कांबळे, राजेंद्र शिळिमकर, मानसी देशपांडे व अनसूया चव्हाण विजयी झाल्या आहेत. प्रभागात ज्या भागात आमचा प्रभाव आहे, तेथील मतदानही भाजप उमेदवारांनाच मिळाल्याचा आरोप करीत पराजित उमेदवार हजारो सर्मथकांसह रस्त्यावर उतरले. शेकडो महिला रस्त्यावर ठाण मांडून बसल्या. त्यामुळे रस्ता बंद होऊन परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पराभूत उमेदवार शैलेंद्र नलावडे (काँग्रेस), सुनील बिबवे (राष्ट्रवादी काँग्रेस), शशिकांत पापळ (शिवसेना), चंद्रकांत आमराळे (मनसे), अस्मिता शिंदे (मनसे), सुवर्णा खरात (मनसे), सोनाली उजागरे (काँग्रेस पुरस्कृत), निर्मळा येळवे (अपक्ष), प्रिती रोकडे (शिवसेना), ज्योती ताकवले (अपक्ष), अमोल रासकर (शिवसेना), संतोष नांगरे (अपक्ष), रिझवान शेख (बहुजन समाज पार्टी), बापू गजधने (बहुजन समाज पार्टी), शतायू भगळ (बहुजन मुक्ती पार्टी), अभिजित टेंबेकर (मनसे), धनकौर दुधानी (शिवसेना) यांच्यासह त्यांच्या सर्मथकांनी बिबवेवाडी ते गणेश कलाक्रीडा मंचापर्यंत मोर्चा काढून रस्त्यावर आंदोलन केले. मतदान यंत्रामध्ये गडबड झाली असून, मतदानामध्ये तफावतीची तक्रार देत फेरनिवडणूक घेण्याचे पत्र सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय निवडणूक अधिकारी हर्षदा गेडाम यांना दिले. या वेळी गेडाम यांनी सदरील तक्रार अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार प्रभाग क्र.२८ सॅलिसबरी पार्क महर्षीनगरमध्ये २७७७१ मतदारांनी मतदान केले; परंतु निवडणूक निकालाच्या दिवशी प्रभागातील विजयी उमेदवारांच्या मतदानांची आकडेवारी ३३७८६ जाहीर केली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी झालेल्या मतदानापेक्षा जास्त मते निकालात दिसून येत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व ठिकाणच्या मतदान यंत्रांमध्ये गडबड झाली असून, फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेसचे उमेदवार शैलेंद्र नलावडे यांनी केली आहे. फेरनिवडणूक घेण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करून कायद्याच्या कक्षेत फेरनिवडणुकांची मागणी करणार असल्याचे चंद्रकांत आमराळे यांनी सांगितले. 

Web Title: defeated supporters on the road