वारकरी व्यासपीठावर सर्व एकसारखेच - पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

देहू - ‘‘तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राजकीयदृष्ट्या कोण मोठे, कोण छोटे हे महत्त्वाचे नाही. या ठिकाणी कोणीही आला तरी नतमस्तकच होतो. अगदी लहान मुलाच्याही पायावर मंदिरातून आलेला व्यक्ती डोके ठेवून विठ्ठल विठ्ठल म्हणतो. त्यामुळे वारकरी व्यासपीठावर सर्व सारखेच आहेत,’’ असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी देहू येथे केले.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त देहू येथे जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात चौदा टाळकरी प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. या प्रवेशद्वारावर संत तुकाराम महाराजांचे चौदा टाळकरी आणि संत तुकाराम महाराज यांचे समकालीन संत अनगडशाह बाबा यांच्या मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे, डॉ. विश्‍वनाथ कराड, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, आळंदी संस्थानचे अध्यक्ष अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, अभिजित मोरे, अशोक मोरे, हेमा काळोखे, बाबूराव वायकर, मनीष झेंडे, माउली काळोखे उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतो. तो शेतकरी असतो. त्यामुळे या सरकारने सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.’’ डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांचे विचारांची ज्या वेळी जगाला ओळख होईल, त्या वेळी सर्वत्र शांतता नांदेल. समाजाला हेच वारकरी शांतीचा मार्ग दाखवतील.’’ संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्‍वस्त राम मोरे यांनी प्रास्ताविक केले. जालिंदर काळोखे यांनी आभार मानले.