चासकमानमधून वेळ नदीत पाणी सोडण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक ते शिक्रापूर आणि तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पाणी योजना सुरळीत चालू राहण्यासाठी चासकमान धरणातून वेळ नदीत तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप यांनी केली. 

चासकमानचे उन्हाळी आवर्तन 22 मार्चपासून सुरू असून ते 45 दिवसांचे आहे. या आवर्तनात फक्त कालव्याद्वारे पूर्व आणि पश्‍चिम अशा तालुक्‍याच्या दोन्ही भागांसाठी पाणी सोडले आहे. यामुळे केवळ पाटाच्या बाजूच्या गावांना व शेतकऱ्यांना लाभ होत आहे. या कालव्यापासून दूर असलेल्या पाणी योजनांना या आवर्तनाचा काहीच फायदा होत नाही.

धरणात सध्या 33 टक्के एवढा पाणीसाठा असून याच आवर्तनावेळी वेळ नदीत पाणी सोडणे गरजेचे असल्याचे उमाप यांनी सांगितले. नदीत पाणी सोडल्यास जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, हिवरे, पिंपळे खालसा, मुखई, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे या गावांसह पुढील काही गावांतील पाणी योजनांना त्याचा लाभ होणार आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या शिक्रापूर शाखेकडे लेखी मागणी केली आहे. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संपर्क केल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, नदीला पाणी सोडल्यास काही प्रमाणात पिकांनाही त्याचा लाभ होणार आहे. पाबळ, केंदूर, जातेगाव, करंदी, जातेगाव खुर्द व बुद्रूक, मुखई, हिवरे व पिंपळे भागांतील ऊस व इतर पिके पाण्यावाचून जळून चाललेली आहेत. यामुळे गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. यासाठीच नदीत तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी उमाप यांनी केली.

Web Title: Demand to release water from Chaskaman Dam