लोकशाहीचे मांगल्यच धोक्‍यात - उल्हास पवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - ""धर्म, जात, समाज, भाषा यांवर आधारित राजकारण करून मतांसाठी भावनिक आवाहन करीत जनतेची दिशाभूल करणे यशवंतरावांना कधीही रुचले नाही. अलीकडील काळात मात्र हे चित्र बदलले आहे. राजकारण्यांची तथ्यहीन वक्तव्ये, अपप्रवृत्ती, संकुचितपणा यामुळे लोकशाहीचे मांगल्यच धोक्‍यात आले आहे,'' अशी खंत कॉंग्रेसचे नेते उल्हास पवार यांनी गुरुवारी व्यक्त केली. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात "आठवणीतले यशवंतराव चव्हाण' या विषयावर पवार बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. 
पवार म्हणाले, ""ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ, मार्क्‍सवाद, गांधीवाद अशा विविध विचारधारांचा काटेकोर अभ्यास करून समाजहितासाठी योग्य ती विचारसरणी अवलंबणारे यशवंतराव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लोकनेते होते. स्वतःवरील टीकेला उत्तर देताना त्यांनी कधीही अपशब्दांचा वापर केला नव्हता. आजच्या राजकारण्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेतला पाहिजे.'' 

"...अत्रेंचे वृत्तपत्र वाचतच नाही' 
यशवंतराव चव्हाण यांची आठवण सांगताना उल्हास पवार म्हणाले, ""आचार्य अत्रे यांनी दैनिक मराठा वृत्तपत्रात यशवंतरावांवर अत्यंत जोरदार टीका करणारा अग्रलेख लिहिला होता. विधान परिषदेत अत्रे, चव्हाण यांच्या उपस्थितीत त्या दिवशी लक्षवेधीचा तास संपल्यानंतर दत्ता शेंडे यांनी सभागृहातच त्या अग्रलेखाबाबत यशवंतरावांकडे विचारणा केली. त्याला उत्तर देताना यशवंतरावांनी प्रथम सभागृहासमोर अत्रेंच्या साहित्याचे वर्णन केले. त्यानंतर ते म्हणाले, की "अत्रेंची ही दर्जेदार साहित्यिक प्रतिमा माझ्या मनात मलिन होऊ नये म्हणून मी मराठा वृत्तपत्र वाचतच नाही.' अतिशय समर्पक भाषेत यशवंतरावांनी केलेले हे विधान म्हणजे लोकशाहीतील चर्चा कशी असावी याचा आदर्श आहे.'' 

Web Title: democracy in danger