सरकारने लोकशाहीचा खून केला - हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पिंपरी - निवडणूक प्रक्रियेत सरकारने अधिकाऱ्यांवर दबाव आणून हस्तक्षेप केला आहे. निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणे काम करण्याऐवजी भाजपच्या उमेदवारांना सोईस्कर होईल, असे काम करून लोकशाहीचा खून केला असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी चिंचवड येथे केला. 

पिंपरी - निवडणूक प्रक्रियेत सरकारने अधिकाऱ्यांवर दबाव आणून हस्तक्षेप केला आहे. निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणे काम करण्याऐवजी भाजपच्या उमेदवारांना सोईस्कर होईल, असे काम करून लोकशाहीचा खून केला असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी चिंचवड येथे केला. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर काँग्रेस कमिटीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन त्यांच्या हस्ते आणि आमदार रामहरी रूपनवर यांच्या उपस्थितीत येथे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पृथ्वीराज साठे, माजी महापौर कविचंद भाट, महिला शहराध्यक्षा गिरिजा कुदळे, एआयसीसीच्या सदस्या निगार बारसकर, महिला प्रदेश कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, गौतम आरकडे, शाम आगरवाल आदी उपस्थित होते. 

 पाटील म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात होण्याऐवजी नागरिकांना शासकीय यंत्रणा वेठीस धरत आहे. मागील अडीच वर्षांत शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून, प्रशासन खिळखिळे झाले आहे. मेक इन इंडियाच्या नावाखाली जाहिरातबाजी करून आठ लाख कोटींची गुंतवणूक आणि पाच कोटी रोजगार निर्मिती करण्याची घोषणा झाली, त्याचे काय झाले. हा नुसता इव्हेंट मॅनेजमेंटचा सोहळा जनतेच्या लक्षात आला आहे. शिवसेनेचे आमदार सत्तेतून बाहेर पडू, असे सांगतात. हा ठरवून चाललेला कार्यक्रम असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. निवडणुकीपुरतेच हे लुटुपुटुचे भांडण असून, कल्याण- डोंबिवलीप्रमाणे निवडणुकीनंतर हे एकत्र येतील.’’

अनधिकृत बांधकामाबाबत शंभर दिवसांत निर्णय घेऊ, अशा भूलथापा देऊन मते मिळविणारे आता कुंटे समितीच्या अहवालाबाबत गप्प का, असा प्रश्न पाटील यांनी विचारला. पिंपरी चिंचवडमधील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात आली आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते काही करू शकत नाहीत. त्यासाठीच पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय व्हावे, ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. आगामी काळात जनता भ्रष्टाचार व गुंडगिरीस प्रतिष्ठा देणाऱ्या या सरकार विरोधात मतदान करेल, असा विश्वास पाटील यांनी केला. 

वचननाम्यात ४४ मुद्यांवर भर
शहरातील अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर, चोवीस तास सुरळीत पाणीपुरवठा, शास्ती कर रद्द करणे आदी प्रमुख मुद्यांवर शहर काँग्रेसने गुरुवारी प्रकाशित केलेल्या वचननाम्यात प्राधान्य दिले आहे. चिंचवड येथील कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या वचननाम्याचे प्रकाशन झाले. वचननाम्यात विकासाच्या ४४ मुद्यांवर भर दिलेला आहे.

वचननाम्यात काय?
 शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची उभारणी
 झोपडपट्टी सर्वांगीण विकास उपक्रम 
 सुरळीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर
 प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण व आवश्‍यक ठिकाणी सायकल ट्रॅक
 लघुउद्योजक व छोट्या व्यावसायिकांसाठी महापालिका स्तरावर पूरक योजना
 घनकचरा निर्मूलन व व्यवस्थापनावर विशेष भर
 महापालिकेच्या अत्याधुनिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारणे
 ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व उद्यानांमध्ये विरंगुळा केंद्र
 समाविष्ट गावांचा सक्षम विकास 
 रेडझोन, ब्ल्यू लाइन आदींबाबत सकारात्मक निर्णय 

Web Title: Democratic government has committed murder