सहआयुक्‍तांसह चौघांची खातेनिहाय चौकशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांचे आदेश; प्राथमिक चौकशीत दोषी
पिंपरी - संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना महापालिकेतर्फे विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती भेट देण्यात आल्या. त्यांच्या खरेदीत झालेल्या गैरव्यवहारात सहआयुक्‍तांसह चार जण दोषी आढळले. त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्‍त दिनेश वाघमारे यांनी दिले.

मूर्ती खरेदीचे प्रकरण स्टिंग ऑपरेशनद्वारे "सकाळ'ने उघडकीस आणले होते. याप्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सहआयुक्त दिलीप काशिनाथ गावडे, भांडार अधिकारी सुरेश लांडगे, भांडार विभाग लेखापाल प्रवीणकुमार देठे, लिपिक भगवंत दाभाडे द्विसदस्य चौकशी समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळले. त्यांना सात सप्टेंबरला नोटीस देऊन खुलासा मागविला होता. त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत.

दोषींवरील आरोप
* अपात्र निविदाधारकांना पात्र करणे
* पुरवठादार मूर्तीचे उत्पादक असल्याची खात्री न करणे
* निविदा छाननी वेळी दक्षता न घेणे
* अपात्र ठेकेदारांना पात्र करणे
* पुरवठादाराने प्राप्तिकर भरला नसतानाही छाननी तक्‍त्यात लिहिणे
* 25 लाख 67 हजार 500 रुपयांच्या खरेदीस स्थायीची पूर्वमंजुरी न घेणे

काय आहे मूर्ती खरेदी प्रकरण
दिंडीप्रमुखांना दिलेल्या मूर्ती बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी केल्याचे प्रकरण "सकाळ'ने 17 जुलैला उघडकीस आणले. त्यानंतर शिवसेना, भाजपने आंदोलन केले. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्‍त दिनेश वाघमारे यांनी मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर व प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त डॉ. महेश डोईफोडे यांची द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली. समितीने 20 ऑगस्टला आयुक्‍तांना अहवाल दिला. त्याच्या आधारे आयुक्‍तांनी भांडार विभागातील चार जणांना नोटीस दिली. त्यांचा खुलासा विसंगत व वस्तुस्थितीला धरून नसल्याने खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले.

दरम्यान, या प्रकरणातील ठेकेदारालाही महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यांचाही खुलासा भांडार विभागाकडे प्राप्त झाला आहे. हा खुलासा आयुक्‍तांकडे पाठविणार असून, पुढील कार्यवाहीबाबत आयुक्‍त आदेश देणार आहेत. दरम्यान, मूर्ती खरेदी प्रकरणातील दोषींवर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मूर्ती खरेदी प्रकरणाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला आहे. भांडार विभागातील चार जणांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.
- दिनेश वाघमारे, आयुक्‍त, महापालिका