आरक्षणासाठी मराठा समाजाचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

पुणे - डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. सरकारला जाग यावी म्हणून तीस मे रोजी मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित निर्धार मेळाव्याचे नेतृत्व विविध जिल्ह्यांतून आलेल्या ३९ महाविद्यालयीन तरुणींनी केले. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा समाजाच्या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. संपूर्ण राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने कार्यकर्ते जमा झाले होते. मुंबई येथे आझाद मैदान ते मंत्रालयापर्यंत महामोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसण्याचा निश्‍चयही या वेळी व्यक्त करण्यात आला. प्रा. संभाजी पाटील म्हणाले,‘‘हा मराठा समाजाच्या मागण्यांसाठीचा मेळावा आहे. तीस मेपर्यंत राज्यभरात सातशे ते आठशे तरुण याबाबत जनजागृती करतील.

समाजाच्या मागण्यांबाबत विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आमची मागणी आहे.

आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही.’’ विद्यार्थींनी आरती इंगोले म्हणाली, ‘‘मराठा समाजाला आरक्षण आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा मिळाली पाहिजे.’’

गायत्री निळकंठे म्हणाली, ‘‘मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषण केले जाईल.’’ मंदाकिनी कल्याणकर म्हणाली, ‘‘पात्रता असूनही मराठा समाजातील मुले-मुली शिक्षण व नोकऱ्यांपासून वंचित आहेत. समाजाचे आमदार, खासदार झाले; परंतु ते समाजाचे प्रश्‍न सोडविण्यात निष्क्रीय ठरले. त्यामुळेच आम्हाला आमच्या प्रश्‍नांकरिता रस्त्यावर उतरावे लागत आहे.’’