धर्मदाय रूग्णालयांनी गरिबांवर उपचार करावेत : धर्मादाय आयुक्त

चिंतामणी क्षीरसागर
रविवार, 22 एप्रिल 2018

राज्यात ४३० रूग्णालयातून गरीबांना उपचार मिळू शकतात, यासाठी योजना आहेत. पण याची माहिती गरिबांना मिळत नाही. ४५ हजार रूपयांच्या आत उत्पन्न असलेल्या रूग्णांना मोफत उपचार दिले जातात.

- धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे

वडगाव निंबाळकर : धर्मादायकडून सवलती मिळवणाऱ्या दवाखान्यांमध्ये गरिबांना मोफत, मध्यमवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळावेत. मोठ्या रूग्णालयात गरीब रूग्ण येत नसतील तर डॉक्टरांनी गरीब रूग्णांपर्यंत पोचून उपचार करावेत, असे आदेश दवाखाना चावणाऱ्या विश्वस्तांना दिले आहेत, अशी माहिती धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली. 

 नीरा (ता. पुरंदर) येथील पत्रकार शमीम आतार यांच्या स्मरणार्थ येथे उपलब्ध होणाऱ्या १०८ या अँम्ब्युलन्सच्या सेवेचा लोकार्पणसोहळा डिगे यांच्या हस्ते रविवार दुपारी पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अॅड. मुकुंदराव ननवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरके शेळके, जि. प. सदस्य शालीनी पवार, पंचायत समिती सदस्य गोरखनाथ माने, उपस्थीत होते.

डिगे म्हणाले, की राज्यात ४३० रूग्णालयातून गरीबांना उपचार मिळू शकतात, यासाठी योजना आहेत. पण याची माहिती गरिबांना मिळत नाही. ४५ हजार रूपयांच्या आत उत्पन्न असलेल्या रूग्णांना मोफत उपचार दिले जातात. त्यापुढील उत्पन्न असणाऱ्यांना सवलती दिल्या जात आहेत. उपचारांसाठी नकार देत असल्यास अशा दवाखान्यांची माहिती धर्मदाय कार्यालयाकडे द्यावी. सवलती मिळवणाऱ्या दवाखान्यांच्या माध्यमातून ३ डिसेंबरला राज्यभरातील ५७ हजार गरीब रूग्णांची तपासणी केली होती. याचा चांगला फायदा झाला, यापुढे पारदर्शकता आणली जाईल. १०८ क्रमांकावरील सेवा रूग्णांसाठी जीवनदान ठरली आहे. 

पत्रकार शमीम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे बंधू पत्रकार मुस्तफा आतार यांच्या प्रयत्नातून ही रूग्णवाहिका सुरू करण्यात आली. पत्रकारिता करीत असताना सामाजिक बांधिलकी जपली जाते ही बाब कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाचे स्वागत अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक मुस्तफा आतार यांनी सूत्रसंचालन गणेश आळंदीकर यांनी तर आभार येथील उपसरपंच बाळासाहेब भोसले यांनी मानले.   

Web Title: Dharmaday Hospital should Treatment on Poor Peoples