दिलीप मोहिते यांचे कौतुक; सुरेश गोरे यांना कॉर्नर

Ajit-Suresh-Dilip
Ajit-Suresh-Dilip

कडूस - राजगुरुनगर (ता. खेड) येथे मंगळवारी (ता. १०) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या सभेत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कौतुक केले; तर ऐन निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मदत करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना ‘मॅच फिक्‍सर’ची उपमा दिली. पण ‘राष्ट्रवादी’मधून शिवसेनेत जाऊन आमदार झालेल्या सुरेश गोरे यांच्यावर आपल्या एका तासाच्या भाषणात चकार शब्दानेही टीका केली नाही. त्यामुळे भविष्यातील निवडणुकीसाठी हातचा राखून ठेवला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.  

राजगुरुनगर येथील मार्केट यार्डच्या पटांगणावर राष्ट्रवादीची हल्लाबोल सभा झाली. या सभेसाठी अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. राजगुरुनगरच्या सभेनंतर भोसरीला ‘हल्लाबोल’ची सभा होती. परंतु राजगुरुनगरच्या सभेला यायला उशीर झाल्याने सुप्रिया सुळे, वळसे पाटील व जयंत पाटील हे व्यासपीठावर हजेरी लावून भाषण न करताच पुढच्या सभेला निघून गेले. त्यामुळे राजगुरुनगर येथील ‘हल्लाबोल’च्या जबाबदारीची धुरा अंगावर घेतलेल्या अजित पवार यांनी तब्बल साडेअठ्ठावन्न मिनिटे भाषण करत एकट्याने किल्ला लढवला. यात त्यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. 

सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेताना, ‘‘मंत्रीच आपल्या ‘पीए’ला आणि सचिवाला ‘सर सर’ करीत आहेत.’’ अशी टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वयोमर्यादेचे भान ठेवण्याचा सल्ला दिला. निवडणुका जवळ आल्या, की बैलगाडा शर्यतीचे गाजर दाखविणारा भुलभुलैया खासदार, अशी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका केली. 

सगळ्या विरोधकांवर टीका करीत असताना अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार गोरे यांच्याबाबत मात्र टीकेचा एक शब्द काढला नाही. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेशी घरोबा केल्याने पवार हे गोरे यांना लक्ष करतात का, याबाबत उत्सुकता होती. परंतु पवारांनी गोरे यांना पूर्णपणे सोडून दिले. पवार आणि गोरे यांच्या जवळिकीची चर्चा असते. गोरे आमदार झाल्यानंतरही त्यांच्यातील वैयक्तिक जवळीक आणखीन वाढल्याचे बोलले जाते. ‘गोरे स्वप्नातसुद्धा दादांना आडवे जाणार नाही,’ असे गोरेंचे निकटवर्तीय सांगतात. हेच संबंध लक्षात घेता विरोधी पक्षाचा आमदार असूनही पवारांनी गोरेंबद्दल साधी नाराजीसुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांसाठी पवारांनी हातचा राखून ठेवला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पक्षविरोधी काम करणाऱ्यांना कानपिचक्‍या
निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्यांचे कान टोचले. ते म्हणाले, ‘‘एकीकडे ‘राष्ट्रवादी’त असल्याचे सांगायचे अन्‌ दुसरीकडे दुसऱ्या पक्षाबरोबर मिलीभगत करायची, मॅच फिक्‍सिंग करायची अन्‌ आपला एक आमदार गमवायचा, हे चांगलं नाही. अशा लोकांवर विश्‍वास ठेवू नका. येत्या काळात ‘राष्ट्रवादी’चे इमाने इतबारे काम करणारा अन्‌ घड्याळाचे चिन्ह घेऊन जो उभा राहील, त्यालाच मदत करायची आहे.’’   

दिलीप मोहिते यांनी अनेक विकासकामे केली. तालुक्‍यात ४२ पूल बांधले. भांडून कामे आणली. ही कामे करताना ते कुठे कमी पडले का? मागेल त्या कामाला निधी दिला. निधी द्यायला मी कुठे कमी पडलो का? एवढं काम करूनही त्यांना तुम्ही पाडले. आता चूक सुधारा.
 - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com