अपंगत्वाचे राजकारण करू नये - डॉ. आगाशे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पुणे - ""डोळे असूनही समाजाच्या प्रश्‍नांकडे पाहण्याची दृष्टी असणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. अशा परिस्थितीत अपंगत्वाचे राजकारण कोणी करू नये, या दृष्टीने सतर्कता बाळगली पाहिजे. तसेच दृष्टिहीन व शारीरिक व्यंग असणाऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या राहुल देशमुख यांच्यासारखे अधिकाधिक कार्यकर्ते निर्माण होणे समाजासाठी गरजेचे आहे,'' असे मत अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी रविवारी व्यक्त केले. 

पुणे - ""डोळे असूनही समाजाच्या प्रश्‍नांकडे पाहण्याची दृष्टी असणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. अशा परिस्थितीत अपंगत्वाचे राजकारण कोणी करू नये, या दृष्टीने सतर्कता बाळगली पाहिजे. तसेच दृष्टिहीन व शारीरिक व्यंग असणाऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या राहुल देशमुख यांच्यासारखे अधिकाधिक कार्यकर्ते निर्माण होणे समाजासाठी गरजेचे आहे,'' असे मत अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी रविवारी व्यक्त केले. 

नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकल चॅलेंज्डतर्फे (एनएडब्ल्यूपीसी) दृष्टिहीन, अपंग, कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर जाधव, माजी आमदार उल्हास पवार, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक अभिजित अनाप, नरेंद्र व्यवहारे, डॉ. विशाल जाधव, संस्थेच्या विश्‍वस्त देवता अंदुरे-देशमुख उपस्थित होत्या. विविध क्षेत्रांत यश मिळविलेल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. 

डॉ. आगाशे म्हणाले, ""शारीरिक व्यंग असणाऱ्यांनी येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करत शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व दिले पाहिजे. अशा व्यक्तींसाठी देशमुख यांनी चांगले कार्य उभे केले आहे. त्यांच्यासारख्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची समाजाला आवश्‍यकता आहे.'' 

डॉ. जाधव म्हणाले, ""शारीरिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्ती स्वतःचा शोध लवकर घेतात. आपली सहानूभुतीपेक्षा गुणवत्तेच्या आधारावर विचार व्हावा, समाजाने गुणग्राहक असावे, एवढीच त्यांची अपेक्षा असते. त्यांना जगातील कुठलीही ताकद अडवू शकत नाही. अशा व्यक्तींना देशमुख यांनी प्रोत्साहन देत सुरक्षितताही दिली. मानसिक व भावनिकदृष्ट्या भक्कम केले. आपल्या मर्यादांचे क्षमतांमध्ये रूपांतर करण्याचा सकारात्मक विचार त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.'' 

देशमुख म्हणाले, ""आमची संस्था छोटी असली तरीही आमची स्वप्ने मोठी आहेत. विद्यार्थी हुशार आहेत, मात्र शारीरिक अपंगत्वामुळे त्यांना अडचणी येतात. त्याविरुद्ध लढण्यासाठी त्यांना बळ मिळावे म्हणून शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते.'' सूत्रसंचालन माया प्रभुणे यांनी केले. 

अपंगांसाठी स्वतंत्र शाळेचा विचार 
शारीरिक व्यंग असणाऱ्या व्यक्ती सक्षमतेने कार्य करतात. अशा क्षमतांचा शारीरिक व मानसिकरीत्या सक्षम असणाऱ्यांमध्येही अभाव जाणवतो. मीच तुमच्याकडून खूप काही शिकते. आगामी काळात महापालिकेमार्फत अपंगांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याचा विचार आहे, असे महापौर टिळक यांनी सांगितले. 

Web Title: Disability should not be in politics