ग्रंथालये म्हणजे समाजसंस्कृतीच्या धमन्या! - ॲलन गिबन्स

ग्रंथालये म्हणजे समाजसंस्कृतीच्या धमन्या! - ॲलन गिबन्स

पुणे - ‘‘ग्रंथालये म्हणजे समाजसंस्कृतीच्या धमन्याच असतात. त्यातून आपला समाज नक्की कोणत्या दिशेने प्रवाहित होऊ पाहतो आहे, हे कळते. जागतिक पातळीवर कितीही विकास घडत गेला, तरी ग्रंथालयांची सामाजिक गरज कायमच राहणार आहे. त्यांचे जतन करुयात...!’’ अशा शब्दांत बाल-कुमारांसाठीच्या लेखनासाठी प्रसिद्ध असणारे आणि ‘ग्रंथालये वाचवा’ चळवळीचे पुरस्कर्ते ब्रिटिश लेखक ॲलन गिबन्स यांनी समाजसंस्कृती आणि त्या अनुषंगाने वाचनसंस्कृतीच्या मुळाशी हात घातला. ग्रंथालयांचे टिकणे म्हणजे सध्याच्या यांत्रिक काळात ‘माणसा’चे अस्तित्व टिकण्यासारखेच असल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.

भारतातील विविध शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या व्याख्यान व समुपदेशनातून सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने गिबन्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. चंडिगडची भेट आटोपून पुणे भेटीस आले असताना ब्रिटिश लायब्ररीत रविवारी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. या गप्पांदरम्यान पुस्तके आणि समाज यासह इतरही अनेक विषयांवर त्यांनी मते मांडली. 

‘शेक्‍सपियरच्या देशात ग्रंथालये मरत जातात; हे घडतेच कसे?’ असा प्रश्‍न उपस्थित करून, गेली पाच वर्षे ब्रिटनमध्ये ग्रंथालय वाचविण्याचा अथक लढा देणारे गिबन्स म्हणाले, ‘‘गेल्या सहा वर्षांच्या काळात आमच्या देशातल्या एकूण ग्रंथालयांपैकी एक चतुर्थांश ग्रंथालये (जवळपास साडेतीनशे) बंद करण्यात आली आहेत. 
 

त्यामुळे तब्बल वीस लाखांहूनही अधिक पुस्तकांचा ठेवा कायमचा डोळ्यांच्या पडद्याआड गेला आहे. हा प्रश्‍न केवळ ब्रिटनपुरता मर्यादित नसून हळूहळू तो जागतिक पातळीवर अनुभवास येत आहे. सामान्य लोकांना विकास-प्रवाहात ओढण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाचा भाग आहेत, हे नाकारून चालायचे नाही. ग्रंथालये म्हणजे फावल्या वेळेत करण्याचा उद्योग नाही. ती सामाजिक गरज आहे. त्यासाठी आम्ही सुरू केलेल्या चळवळीची ब्रिटनने दखल घेतली असून, ग्रंथालये बंद होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.’’

गरिबी ही केवळ वस्तू किंवा सुविधांची नसते, ती लोकांच्या ‘इच्छे’चीही असू शकते. वाचनसंस्कृतीपुढे ही ‘वाचनेच्छेची गरिबी’ दूर सारण्याचे एक कठीण आव्हान आहे, असेही ते म्हणाले.

‘बंदूक’ हा उपाय असूच शकत नाही !
मुलांच्या भावविश्‍वासंबंधीचे विषय हाताळतानाच आपल्या लेखनात समकालीन समस्यांचा अंतर्भाव गिबन्स करतात. त्यांच्या आगामी पुस्तकात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडे ओढली जाणारी कुमार वयातील मुले, हा वास्तववादी विषय हाताळला आहे. ते म्हणाले, ‘‘बंदूक हातात घेतल्यास प्रश्‍न सुटण्याऐवजी अधिक जटिल होतात. दहशतवादाच्या प्रश्‍नाने आज भारतच नव्हे, तर ब्रिटन आणि अमेरिकेपुढेही आव्हान उभे केले आहे. अशावेळी नव्या पिढीने दहशतवादाकडे वळणे ही गंभीर बाब आहे. ही मानसिकता बदलण्यात लेखणीचे योगदान प्रभावी ठरू शकते. त्यातून काही प्रश्‍न उपस्थित करून त्यांचे मनःपरिवर्तन घडवून आणता येऊ शकते.’’

भारतीयांचा कल अभिजात वाचनाकडे अधिक 
भारतात वाचनसंस्कृती रुजलेली आहे. ब्रिटनच्या तुलनेत येथील तरुण ‘इंटेलिजेन्ट आणि शार्प’ आहेत. भारतीयांचा प्रामुख्याने अभिजात वाचनाकडे कल जाणवतो. भारतीय लेखनांत रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यात साहित्यिक मूल्यांबरोबरच सामाजिक मूल्यही प्रकर्षाने जाणवते. सध्या विक्रम सेठ यांचे साहित्य आपल्याला आवडते. मूळ भारतीय वंशाचे व सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले बाली राय, जमिला गॅविन, इरफान मास्टर यांसारख्या ‘अँग्लो इंडियन’ साहित्यिकांचे लेखनही प्रभावी आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com