चांदणी चौकावरून नवा वाद

Chandani-Chowk
Chandani-Chowk

पुणे - चांदणी चौक येथील उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन दीड वर्षे झाले, तरी काम मार्गी लागण्याऐवजी या प्रकल्पातील वाद मिटण्यास तयार नाही. या पुलाच्या कामासाठी नेमकी किती आणि कोणती जागा संपादित करावयाची आहे, त्यांची नावे जाहीर करण्याऐवजी महापालिकेकडून देण्यात आलेल्या प्रकटनात सरसकट जागामालकांचा समावेश केल्याने त्यावरून नव्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे भूसंपादन तर सोडाच, महापालिकेला त्यावरून नोटिसा देण्यास सुरवात झाली आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण आणि उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारनेदेखील निधी मंजूर केला आहे. दीड वर्षापूर्वी महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाजतगाजत या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. जागा ताब्यात नसताना कार्यक्रम उरकल्यामुळे काम रखडले होते. त्यांनतर दोन ते तीन वेळा गडकरी यांनीदेखील जाहीर नाराजी व्यक्‍त केली होती. असे असताना महापालिकेने आता या कामासाठी भूसंपादनाबाबत १७ सप्टेंबर रोजी वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटन दिले आहे. त्या जाहीर प्रकटनामध्ये ज्या जागेचे भूसंपादन करावयाचे आहे, त्या जागामालकांचा समावेश करण्याऐवजी सरसकट जागामालकांचा समावेश केल्यामुळे त्यातून गोंधळ उडाला आहे.

या संदर्भात अनेक जागामालकांनी नाराजी व्यक्त करीत महापालिकेकडे धाव घेतली आहे. महापालिकेने काढलेल्या या जाहीर प्रकटनामध्ये उड्डाण पुलासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेचे सीमांकन (मार्किंग) केले असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात जागेवर तसे कोणतीही गोष्ट केलेली नाही. तसेच, उड्डाण पुलाच्या नकाशाला कोणाची मान्यता आहे, पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे का, असे अनेक प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणी जवळपास शंभर नागरिकांनी या प्रकरणी महापालिकेला नोटीस पाठवली आहे.

भूसंपादनात होणाऱ्या क्षेत्राचे मार्किंग केले असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. आतापर्यंत तरी आमच्या जागेवर अशा कोणत्याही प्रकारचे मार्किंग करण्यात आलेले नाही. तरीदेखील जाहीर प्रकटनामध्ये आमचे नाव  आहे. माझ्याप्रमाणे अनेकांचा संबंध नसताना त्यांच नाव प्रकटनामध्ये आले आहे. त्यामुळे आम्ही महापालिकेला या संदर्भात नोटीस बजाविणार आहे.
- मानवेंद्र वर्तक, रहिवासी, चांदणी चौक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com