'डीएमयू'ला अखेर मुहूर्त सापडला - रेल्वेमंत्री प्रभू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - पुणे- दौंड उपनगरीय रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे. शनिवारी (ता. 25) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे पुणे- दौंड मार्गावर "डीएमयू'ला (डिझेल मल्टिपल युनिट) हिरवा झेंडा दाखविणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना पुणे- दौंड उपनगरीय सेवेचा लाभ घेता येणार आहे.

पुणे - पुणे- दौंड उपनगरीय रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे. शनिवारी (ता. 25) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे पुणे- दौंड मार्गावर "डीएमयू'ला (डिझेल मल्टिपल युनिट) हिरवा झेंडा दाखविणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना पुणे- दौंड उपनगरीय सेवेचा लाभ घेता येणार आहे.

पुणे- मिरज- लोंढा मार्गाचे दुपदरीकरण, पुणे स्थानकावरील सोलर पॉवर प्रकल्प, वाय- फाय सुविधा, पुणे- दौंड मार्गाचे विद्युतीकरण, पाण्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आदींचे उद्‌घाटनही रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम कोल्हापूर स्थानकावर होणार आहे. याच कार्यक्रमात प्रभू पुणे- दौंड गाडीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविणार आहेत. त्यानंतर "डीएमयू' पुणे स्थानकावरून दौंडसाठी रवाना होईल.

या मार्गावरील काही स्थानकांवर आवश्‍यक सुविधा नसल्याने लोकलऐवजी "डीएमयू'चा पर्याय पुढे आला होता. त्यानुसार जानेवारीत पहिली डीएमयू पुण्यात दाखल झाली. टप्या-टप्प्याने आणखी दोन गाड्या दाखल झाल्या. त्यांची चाचणीही यशस्वीरीत्या झाली. मात्र, उद्‌घाटनासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची वेळ मिळत नसल्याने ही सेवा सुरू करण्यास विलंब होत होता. अखेर प्रभू यांनी वेळ दिल्याने या गाडीचा शुभारंभ शनिवारी होणार आहे.

दरम्यान, या निर्णयाचे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, ""उशिरा का होईना, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीची दखल घेतली. ही "डीएमयू' लोणावळ्यापर्यंत सुरू करावी. तसेच पुणे- सातारा, पुणे- लोणंद- फलटण, पुणे- दौंड- सोलापूर आणि पुणे- दौंड- नगर अशी सेवा सुरू करावी.''

"डीएमयू' बारामतीपर्यंत?
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुणे- दौंड "डीएमयू'चे उद्‌घाटन झाल्यानंतर ही गाडी पुण्याहून दौंडकडे रवाना होईल. "डीएमयू'च्या दिवसभरात दहा फेऱ्या होणार असतील, तर त्यापैकी काही फेऱ्या बारामतीपर्यंत करता येतील का, याबाबत विचार सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

"डीएमयू'चे अखेर उद्‌घाटन होत आहे, ही चांगली बाब आहे. परंतु या मार्गावर ईएमयू (इलेक्‍ट्रिकल मल्टिपल युनिट) सुरू करण्याकडे दुर्लक्ष करू नये. येत्या वर्षभरात त्याचेही उद्‌घाटन कसे होईल, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा. दोनशे कोटी रुपये खर्च करून ईएमयू सुरू करता आली नाही, तर ते रेल्वे प्रशासनाचे अपयश ठरेल. गाडीचे वेळापत्रक तयार करताना प्रवाशांना विश्‍वासात घ्यावे.
- विकास देशपांडे, सदस्य, मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती

Web Title: dmu muhurt