मुलांशी सतत उपदेशाच्या शैलीत बोलू नका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑगस्ट 2016

नव्या पिढीला "डिजिटल जनरेशन‘ म्हटले जाते. त्यांना मोबाईल, टीव्हीपासून लांब ठेवणे कठीण आहे; पण अशक्‍य नाही, असेही त्या म्हणाल्या. हे प्रदर्शन अत्रे सभागृहात 5 सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळात खुले असेल.

 

पुणे - ""घरातील मुलांचे भावनिक अस्थिरतेपासून तंत्रज्ञानाच्या अतिरेकापर्यंतचे सर्व प्रश्‍न सहज सुटू शकतात. त्यासाठी पालकांनी थोडे स्वत:ला बदलायला हवे. मुलांना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधायला हवा. सतत उपदेशाच्या शैलीत मुलांशी बोलू नये,‘‘ असा सल्ला लेखिका व बालविकास तज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी शनिवारी दिला. 

"सकाळ प्रकाशना‘तर्फे डॉ. पानसे यांची "पहिली आठ वर्षे‘ आणि "टीनएजर्सच्या मनात‘ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यानिमित्ताने सकाळ प्रकाशन आणि ज्ञानगंगा "ज्ञानोत्सव‘ ग्रंथप्रदर्शनातर्फे आयोजित अनौपचारिक मैफलीत त्यांनी पालकांशी संवाद साधला. मूल वेळेवर जेवत नाही, कंटाळा आला म्हणते, लिहायला बसत नाही, फक्त मोबाईलसोबतच खेळते, अशा पालकांच्या विविध प्रश्‍नांची उत्तरेही त्यांनी दिली. "सकाळ प्रकाशना‘च्या दीपाली चौधरी आणि "ज्ञानगंगा‘चे उमेश पाटील उपस्थित होते. 

डॉ. पानसे म्हणाल्या, ""मूल जन्मल्यानंतर सुरवातीची दोन वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. या काळात त्यांना आपण जे अनुभव देऊ ते स्पंजप्रमाणे शोषून घेतात. सहाव्या वयापर्यंत मुले दंगा, मस्ती करतात. घराबाहेरचे जग अनुभवत असतात. त्यापुढच्या वयात साहसी-धाडसी होऊ पाहतात. त्यांचे वागणे बदलते. त्यांना लहान-लहान जबाबदाऱ्या हव्या असतात; पण दहावीनंतर मुलात वेगवेगळे बदल होतात. या काळात मुलांना अधिक समजून घेणे, त्यांच्याशी मैत्री करणे, मनमोकळ्या संवादातून चांगल्या गोष्टी समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता पालकांना मुलांसाठी वेळ द्यावा लागेल.‘‘ 

नव्या पिढीला "डिजिटल जनरेशन‘ म्हटले जाते. त्यांना मोबाईल, टीव्हीपासून लांब ठेवणे कठीण आहे; पण अशक्‍य नाही, असेही त्या म्हणाल्या. हे प्रदर्शन अत्रे सभागृहात 5 सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळात खुले असेल.

 

टॅग्स
फोटो गॅलरी