यात्रेनिमित्त 'नैवेद्याची नासधूस टाळा, शिधा दान करा' उपक्रम

shidha
shidha

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथ यात्रेनिमित्त 'नैवेद्याची नासधूस टाळा, शिधा दान करा' या उपक्रमातून जमा झालेल्या १ हजार २५० किलो कोरडा शिधा व ५० लीटर तेलाचे सेवाभावी संस्थाना वाटप करण्यात आले. मागील वर्षापासून लोणी काळभोर ग्रामस्थांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

यंदाची यात्रा शनिवार (ता. ३१ मार्च) व रविवार (ता. १) या दोन दिवसांत पार पडली. गावात यात्रेच्या दिवशी महिला मंडळी पहाटे लवकर उठून देवांसाठी नैवेद्याची तयारी करतात. तसेच एका घरामध्ये सुमारे २० ते ३० नैवद्य बनवले जातात. मात्र मंदिरातील देवांना वाहिले जाणारे नैवेद्य उपयोगात न येता तसेच वाया जातात किंवा बाहेर फेकून दिले जातात. यामध्ये सुधारणा करावी किंवा काही तरी बदल करावा असे मत तरुण पिढीने दोन वर्षापूर्वी झालेल्या यात्रेनंतर सोशल मिडीयावर मांडला होता. त्यावेळी या कल्पनेचे भरपूर कौतुक झाले तसेच अंबरनाथ देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत मागील वर्षी हा विषय घेण्यात आला होता. त्यानुसार यंदाच्या झालेल्या यात्रेत देखील नैवेद्याची नासधूस टाळून कोरडा शिधा दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

गतवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांकडून एकूण ३०० किलो तांदूळ, २०० किलो पीठ, ३०० किलो गहू, २०० किलो डाळ, २५० किलो गूळ व ५० लीटर इतके तेल असा शिधा जमा झाला. जमा झालेला सर्व शिधा वाई (जि. सातारा) येथील मांढरदेव देवस्थान ट्रस्ट, मांजरी (ता. हवेली) येथील राजमाता महिला शिक्षण संस्थेच्या मतिमंद विद्यालय व कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयास दान करण्यात आला. 

शिधादान उपक्रम राबविण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष काळभोर, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, उत्सव समिती अध्यक्ष सतीश काळभोर, कमलेश काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. तसेच अशा उपक्रमातून जमा होणारा शिधा गरजू व्यक्ती व संस्थांपर्यंत पोहचावा व या उपक्रमाची राज्यस्तरावर नोंद घेण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असल्याची माहिती कमलेश काळभोर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com