आकाश दर्शनानं संकुचित वृत्ती नाहीशी

गुरुवार, 4 जानेवारी 2018

ॲडव्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली पुरस्कार ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर झाला आहे. याचे वितरण रविवारी (ता. ७) पुण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर; तसेच चितमपल्ली यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानिमित्त डॉ. तुपे यांच्याशी सुनील माळी यांनी साधलेला हा संवाद.

तुम्ही जैवरसायन विषयाचे विद्यार्थी आणि प्रथिने-वितंचकचे (एन्झाइम) उत्पादक. मग खगोलशास्त्राकडे कसे वळलात?
- प्रतिजैविके म्हणजेच अँटिबायोटिक्‍स या विषयावर पीएचडी करण्यासाठी पिंपरीच्या एचए कंपनीत गेलो तेव्हा आपणही कारखाना काढावा असे वाटले; त्यामुळे हडपसरला प्रथिने-वितंचकाचा कारखाना सुरू केला. हडपसर हे माझं गाव. हडपसरला आम्ही शेतावर राहात असू. तिथं वीज नसल्यानं मोकळं आकाश, तारे दिसत. आजोबांना ग्रह-ताऱ्यांबाबत थोडं कळायचं. ते माहिती सांगत. तेव्हा आकाशाविषयी आकर्षण वाटू लागलं. त्यानंतर १९८० मध्ये खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी गदगला गेलो. खग्रास ग्रहण पाहिल्यानंतर अक्षरशः वेडाच झालो. त्या वेळीच ठरवलं या क्षेत्राची माहिती मिळवायची. त्याच काळात ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे पदाधिकारी तिथं आले होते. त्यांच्याशी ओळख झाली. त्या संस्थेत काम करू लागलो अन्‌ प्रथम कार्यवाह आणि नंतर उपाध्यक्ष, अध्यक्ष झालो. मी संस्थेचा कार्यवाह असताना पुण्यात आयुका आली. त्या वेळी मी नारळीकरांना गाठून ‘तुम्ही अध्यक्ष व्हाल का?’ असं विचारलं. ते हसले अन्‌ ‘तुला मी चांगला माणूस देतो’ असं सांगून त्यांनी डॉ. नरेश दधिच यांना ‘तू अध्यक्ष हो’ असे सांगितले. त्यामुळे माझा ‘आयुका’शी संपर्क वाढत गेला. खगोलशास्त्राचा अभ्यास होऊ लागला. नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीमध्येही मी शिकलो.

 तुम्ही लिखाण कसे सुरू केले?
- ‘सकाळ’मध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी साताऱ्याचे कोळेकर ग्रह-ताऱ्यांबाबत सदर लिहीत असतं आणि ते खूप वाचनीय होते. कोळेकर निवर्तल्यानं मला लिहायला सांगितलं गेलं. त्यानंतर म्हणजे १९८८ पासून आतापर्यंत खंड न पडता मी सलग महिन्यांच्या आकाश दर्शनाबाबत लिहितो आहे. या विषयावर मराठीत फारशी पुस्तके नव्हती. गो. रा. परांजपे यांचे राज्य सरकारने काढलेले पुस्तक मिळेनासे झाले होते. त्या वेळी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेने विचारले, ‘अशा प्रकारचे पुस्तक तुम्ही लिहालं का?’ त्यामुळं मुलांना समजेल अशा भाषेत ‘छंद आकाश दर्शनाचा’ हे पहिलं पुस्तक मी लिहिलं. त्यानंतर सुनीता विल्यमवरील पुस्तक, तसंच ‘रहस्ये अंतराळातील’, ‘स्फुटनिक ते चांद्रयान’ अशी माझी काही पुस्तकही उल्लेखनीय ठरली.

 खगोलशास्त्रातील करिअरबाबत सांगा.
- खगोलशास्त्राची आवड असणाऱ्यांनी प्रथम स्वनिरीक्षण करावं. त्याचबरोबर भरपूर वाचनही केलं पाहिजे. इंग्लिशमध्ये या विषयाची प्रचंड ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्यात पॅट्रिक मूर यांच्या पुस्तकांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या आकाशवेड्या माणसाचा ‘स्काय ॲट नाईट’चा बीबीसीवरील कार्यक्रम अनेक दशके लोकप्रिय ठरला होता. या क्षेत्रात अनेक संधी आहेत. आयुका, भारतीय अवकाश संस्था म्हणजेच इस्रोसारख्या संस्थांत त्यांना काम करता येते. वरुण भालेराव, योगेश वाडदेकर अशी तरुणांची नावंही याबाबत घेता येतील.

 सर्वसामान्यांनी आकाश दर्शन का करावं?
- आकाश दर्शनानं माणसाची संकुचित वृत्ती नाहीशी होते. आकाश, विश्‍व किती मोठं आहे हे कळतं. कोट्यवधी तारे अन्‌ ग्रहांच्या नकाशात पृथ्वी दिसतही नाही. आपल्या लहानपणाची जाणीव झाली की मन विशाल होतं. शनि, गुरू हे वायूचे गोळे आहेत, हे तुम्ही शिकलात तर अंधश्रद्धांपासून दूर जाता.

Web Title: Dr. prakash tupe interview